प्रथमच १०० कोटींचा टप्पा पार; वर्षभरातील एकूण वसुली ५४० कोटींच्या वर

थकबाकीदारांच्या दरवाजात ढोल-ताशांचा गजर, पाणीपुरवठा खंडित करणे, बँक खाते सील करणे, अटकावणी यासारख्या विविध उपाययोजनांमुळे आर्थिक वर्षांच्या अखेरच्या महिन्यातील करवसुलीचा आकडा १०० कोटींच्या पलीकडे गेला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिन्यात एवढी मोठी रक्कम वसूल करण्यात यश आले आहे. वर्षभरातील एकूण वसुली ५४० कोटींवर पोहोचली आहे. मालमत्ता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच हा विक्रमी आकडा गाठणे शक्य झाल्याचे आयुक्त रामास्वामी एन. यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

नवी मुंबई महापालिकेचे रौप्यमहोत्सवी वर्ष नुकतेच संपले. स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वीरीत्या राबवण्याची घाईगडबड सुरू असतानाच आयुक्तांनी मालमत्ता करवसुलीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना वसुलीसाठी योग्य निर्देश दिले होते. त्याप्रमाणे विविध उपक्रम राबवून वसुलीची धडक मोहीम राबवण्यात आली होती.

मागील आर्थिक वर्षांत मालमत्ता करवसुली ६४४ कोटी ५४ लाख रुपये होती. यंदा ती ५४० कोटींवर आहे. त्यामुळे यंदाची वसुली कमी झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्ष वसुली गतवर्षीपेक्षाही जास्त असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला होता. अखेरच्या महिन्यात वसुली १०५ कोटींच्या वर गेली आहे. आजूबाजूच्या शहरांपेक्षा पालिकेची मार्च महिन्यातील वसुली अधिक असल्याचा दावा मालमत्ता कर अधिकाऱ्यांनी केला आहे.

गेल्या वर्षी नोटबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटांद्वारे मालमत्ता कर भरण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गेल्य वर्षी मोठय़ा प्रमाणात झाली होती. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात निर्माण केलेला दराराही याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत होते.

गतवर्षीच्या तुलनेत पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीची जमा रक्कम कमी दिसत असली तरी त्याला विविध कारणे असून यंदाची वसुली ही मागील काही वर्षांतील प्रत्यक्ष वसुलीपेक्षा अधिक असल्याचा दावा प्रशासनाने केला होता.

त्याप्रमाणे मार्च महिन्यामध्ये मालमत्ता विभागाचे उपायुक्त धनराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीचा पालिकेने उच्चांक गाठला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे, असे मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले.

सर्व कर्मचारी स्वच्छता सर्वेक्षणाच्या कामात व्यग्र होते, परंतु मालमत्ता उपायुक्त व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली वसुली होईल, याची खात्री होती. त्याप्रमाणे वसुली झाली आहे. वसुलीसाठी ढोल वाजवण्याबरोबरच विविध उपाययोजना करण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची वसुली कमी दिसत असली तरी प्रत्यक्ष वसुली अधिक आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच मार्च महिन्यातील वसुली १०० कोटींच्या वर गेली आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महापालिका

मालमत्ता      करवसुली (कोटींमध्ये)

२०१४-१५                   ४०७

२०१५-१६                   ५१५

२०१६-१७                   ६४४

२०१७-१८                   ५४०

 

एलबीटी             वसुली (कोटींमध्ये)

२०१६-१७               ८८३.६६

२०१७-१८             ११९६