News Flash

ऐरोली ते उरण सागरी मार्ग

‘एमएमआरडीए’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश;रखडलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा

‘एमएमआरडीए’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश;रखडलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा

नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात भविष्यात वाढणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ऐरोली ते वाशी आणि वाशी ते उरण या खाडीकिनाऱ्यालगत पाच हजार कोटी रुपये खर्च करून एक सागरी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘एमएमआरडीए’चे प्रमुख ए. राजीव यांना तसे निर्देश दिले. नवी मुंबईतील अनेक रखडलेल्या प्रकल्पांविषयी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनी या वेळी चर्चा केली.

राज्य शासन, सिडको तसेच एमएमआरडीएकडे रखडलेल्या नवी मुंबईतील काही प्रकल्पांविषयी खासदार राजन विचारे यांच्या आग्रहास्तव गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात नवी मुंबईतील काही महत्त्वांच्या प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. यात घणसोली ते ऐरोली हा सहा किलोमीटर लांबीचा गेली बारा वर्षे रखडलेला पामबीच विस्तार मार्गाविषयी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. पावणेदोन किलोमीटरच्या कांदळवनामुळे हा प्रकल्प रखडला आहे. सिडकोने बांधलेल्या वाशी ते बेलापूर या पामबीच विस्तार मार्गाचा हा अतिरिक्त रस्ता आहे. या मार्गामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. जवळपास ३८१ कोटी खर्चाच्या या कांदळवन मार्गाला सागरी नियंत्रण विभागाची परवानगी लागणार आहे. या मार्गाच्या दुतर्फा सिडकोचे काही भूखंड विकणे अद्याप शिल्लक असल्याने या मार्गामुळे या भूखंडांना कमालीची किंमत येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सिडकोनेही हातभार लावावा ही पालिकेची मागणी मान्य झाली असून सिडको आता अर्धा खर्च उचलणार आहे.

याशिवाय महापे ते अरेंजा कॉर्नर या दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे कामही हाती घेतले जाणार आहे. हा संपूर्ण मार्गही पामबीच मार्गाचा भाग असून या प्रकल्पातही सिडकोने आर्थिक साहाय्य करावे अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. या मार्गामुळे या ठिकाणी असलेले तीन सिग्नलपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. या भागात एपीएमसी बाजारपेठ असल्याने या मार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडी असल्याचे दिसून येते. नवी मुंबई विमानतळ आणि नैनानंतर महामुंबई क्षेत्राचा होणारा विकास आणि वाढती लोकंसख्या लक्षात घेता या भागात खाडीकिनारा मार्ग उभारण्याच्या यापूर्वी मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. ऐरोली ते वाशी आणि वाशी ते उरण या महामुंबई क्षेत्रातील वाहतुकीला पर्याय ठरू शकणाऱ्या या २७ किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी करणे आवश्यक असून त्यासाठी एमएमआरडीए पुढाकार घेणार आहे. या प्रकल्पाचा अर्हता अहवाल तयार करण्याचे कामही एक संस्था करणार असून यावर प्रारंभीच्या अंदाजानुसार पाच हजार कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. हा मार्ग गुजरात, राजस्थान येथून येणाऱ्या वाहतुकीलाही पर्याय ठरणार आहे. याशिवाय गवळी देव पर्यटन विकास, जैवविविधता विकास, तुर्भे सेक्टर २० साठी भुयारी मार्ग, कळवा एलिव्हिटेड मार्ग, रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि भूमिपुत्रांच्या प्रश्रांनासंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी पालकमंत्री शिंदे यांच्यासह, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अप्पर मुख्य सचिव अशीष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे ए. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर हे उपस्थित होते.

‘क्रीडा संकुलाचा प्रस्ताव सादर करा’

घणसोली येथे ३८ एकरचा भूखंड क्रीडा संकुलासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सिडकोच्या अखत्यारीत असलेला हा भूखंडावर अतिक्रमण होण्यापूर्वी काम सुरू होणे आवश्यक आहे. याबाबत लवकरात लवकर पालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

* ऐरोली ते वाशी आणि वाशी ते उरण.

* २७ किलोमीटर लांबी.

* पाच हजार कोटी रुपये खर्चाची अपेक्षा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 1:09 am

Web Title: navi mumbai coastal road airoli to uran coastal road zws 70
Next Stories
1 खाडीपुलावर सापडलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार?
2 जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण
3 नववर्षांरंभी शाळांची घंटा?
Just Now!
X