शुल्कवाढीच्या निषेधार्थ एकदिवसीय संप

नवी मुंबईतील रिक्षा संघटनांनी मंगळवारी परिवहन विभागाच्या वाढीव फीविरोधात एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने रिक्षासह सर्वच प्रवासी वाहनांच्या फी व दंडाच्या रकमेत केलेली भरमसाट शुल्कवाढ रद्द करावी या मागणीसाठी नवी मुंबई रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले.

[jwplayer xR0aWhOb]

राज्यातील विविध ठिकाणी संघटनांच्या माध्यमातून शुल्कवाढीविरोधात आंदोलने करण्यात आली, मात्र केंद्रीय परिवहन विभागाने दखल घेतली नाही, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. या एकदिवसीय आंदोलनात नवी मुंबईतील १० हजार रिक्षाचालकांनी भाग घेतला, अशी माहिती रिक्षाचालक-मालक एकता युनियनचे अध्यक्ष सुनील बोर्डे यांनी दिली. केंद्र सरकारने एच.पी. चढविण्याचे शुल्क १०० रुपयांवरून १५०० रुपये केले आहे. रिक्षा पासिंगला पूर्वी २०० रुपये लागत आता ही रक्कम ६०० रुपये करण्यात आली आहे, परवाना नूतनीकरणाचे शुल्क ३४१ रुपयांवरून ६६४ रुपये करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरणाचे विलंब शुल्क ५० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आले आहे. या प्रचंड दरवाढीचा निषेध करण्यासाठी बंद पाळण्यात आला. प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्यामुळे ते गोंधळले होते. त्यांनी रेल्वे, बसचा पर्याय स्वीकारला. बससाठी प्रवाशांच्या भल्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.

केंद्र सरकारच्या परिवहन विभागाच्या अन्यायकारक शुल्कवाढीचा नवी मुंबईतील सर्व रिक्षाचालकांनी निषेध केला. वाढीव दर रद्द करण्यासाठी एकदिवसीय रिक्षाबंद आंदोलन छेडण्यात आले होते. सरकारने शुल्कात प्रचंड वाढ केली आहे. ही वाढ रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. सरकारने योग्य तोडगा न काढल्यास सर्वाच्या सहमतीने पुढचे पाऊल उचलले जाईल.

– सुनील बोर्डे, अध्यक्ष, रिक्षाचालक-मालक एकता युनियन

[jwplayer vFC2G5fA]