नवी मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा १४ हजारच्या पार झाला असला तरी करोनामुक्तीच्या दरातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ६६ टक्के झाला आहे. ही वाढ शहरवासीयांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. पालिकेची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासह नागरिकांमध्ये करोनाविषयक जागृती या महत्त्वाच्या मुद्दय़ावर प्रशासन भर देत आहे. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांत रोजची रुग्णसंख्या २५० ते ३५०च्या घरात आढळत आहे. रुग्णवाढीच्या वेगामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, भयभीत होण्याची गरज नसल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार सांगितले जात आहे. तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या काळात चाचण्यांची संख्या मर्यादित होती. मात्र, आयुक्तपदी बांगर यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. सध्या रुग्णसंख्या जास्त दिसत असली तरी तातडीने चाचण्यांना सुरुवात केल्याने निदान लवकरच होऊन वेळेत उपचारांना सुरुवात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे करोनामुक्तीच्या दरात वाढ झालेली दिसत आहे.

काही रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत. पण, अहवाल सकारात्मक आहे, तर काहींमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. दक्षता घेण्याची आवश्यकता असलेल्या आणि करोनामुळे मृत झालेल्यांमध्ये ५० वयोगटावरील रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली आणि तुर्भे परिसरात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. त्याला अटकाव करण्यासाठी तात्काळ चाचण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी नेरुळ येथे पालिकेची स्वतंत्र प्रयोगशाळा उभारली जात आहे. ती शनिवापर्यंत कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या दिवसाकाठी दोन हजार चाचण्या केल्या जात आहेत.

करोनास्थिती

१ जुलै

*  एकूण बाधित : ६८२३

* करोनामुक्त रुग्ण : ३८३४

* करोनामुक्तीचा दर : ५६ टक्के

२७ जुलै

* एकूण बाधित : १३,९३२

* करोनामुक्त रुग्ण : ९,१४१

* करोनामुक्तीचा दर : ६६ टक्के