पालिका निवडणुकीपूर्वीच्या अंदाजपत्रकात उत्तम नागरी सुविधांचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न

संतोष जाधव, लोकसत्ता 

नवी मुंबई : पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आलेला नवी मुंबई पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आठवडाभरात सादर करणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आली नसली तरी उत्तमोत्तम नागरी सुविधा पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

अर्थसंकल्पासाठीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा अर्थसंकल्प किती कोटींनी वाढणार, तसेच नवीन कोणकोणत्या बाबींचा उल्लेख यात असेल याबाबतही उत्सुकता आहे. मूलभूत सुविधांसह शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक स्वागत कमानी, वाहनतळांबाबत विशेष उपाययोजना, पर्यटनस्थळे आणि शहर सौंदर्यीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे.

शहरात वाहतूक कोंडीची समस्या अधिक आहे. यासाठी सुनियोजित वाहनतळे, तसेच वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी भर दिला जाणार आहे. बहुमजली वाहनतळ हा यातील महत्त्वाचा भाग राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी नागरिकांवर कोणत्याही कराची वाढ करण्यात आलेली नव्हती. परंतु यंदा शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला २०१९-२०चा अर्थसंकल्प १५ फेब्रुवारी २०१९ रोजी मांडण्यात आला होता. गेल्या वर्षी ९१० कोटी १५ लाख आरंभीच्या शिलकीसह तीन हजार ४५५ कोटी ६४ लाख कोटींची जमा, तसेच तीन हजार ४५४ कोटी ७३ लाख खर्चाचा आणि ९१ लाख रुपये शिलकीचा मूळ अंदाज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. त्यात स्थायी समिती आणि महासभेने वाढ सुचवून एकूण ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता.

भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांनी कोणतीही करवाढ होऊ  देणार नसल्याचे घोषित केले आहे. शहरात नागरिकांच्या हितासाठी भविष्याचा विचार करता यंदाचा अर्थसंकल्प नवी मुंबईकरांना भौतिक व नागरी सुविधा देण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, परिवहन, पर्यटनाच्या सर्वोत्तम सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामे निश्चित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रकल्प कागदावरच

* फेरीवाला परवाना धोरण निश्चित करण्यात आले होते. परंतु त्यांचे सर्वेक्षण पालिकेने केले. परंतु फेरीवाला परवाना अद्याप लालफितीत आहे.

* जुईनगर रेल्वे उड्डाणपूल निविदांच्या फेऱ्यात

* सानपाडा येथील पामबीच मार्गावर, एनआरआय येथे पामबीच मार्गावरील भुयारी पुलाची निर्मिती अद्याप नाही. त्यासाठी १०.४९ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

* -नेरुळ येथील विज्ञान केंद्र निविदांच्या फेऱ्यात अडकले होते. घणसोली व ऐरोली येथील नागरिकांकरिता नाटय़गृह अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. महापालिकाक्षेत्रातील ऑलिम्पिक दर्जाचा  शहरातील पालिकेचा पहिला तरणतलाव अंदाजे १४६ कोटींचा प्रस्तावही निविदांमध्येच अडकला आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणत्याही करात वाढ करण्यात येणार नसून शहरात जास्तीत जास्त भौतिक व नागरीसुविधा देण्याबरोबरच पार्किंग आणि इतर समस्यांचे निराकरण करण्यावर भर राहील. विविध प्रकल्प निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यंदाचा अर्थसंकल्प १५ फेब्रुवारीपूर्वीच सादर केला जाईल.

  अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका