नवी मुंबई महानगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीत दोन कोटी ६० लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
आग्रोळी गावठाण विस्तार योजना सेक्टर-३०-३१ या भागात नव्याने इमारती उभारल्या जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक मलनिस्सारण वाहिनी सुविधा पुरवावी लागणार आहे. ही वाहिनी टाकणे, किल्ले गावठाणातील सागरी पोलीस स्थानकांपर्यंत ३०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकणे, तुभ्रे येथील दिवाबत्ती देखभाल आणि दुरुस्ती, सीबीडी बेलापूर येथील सेक्टर-१ ते ९ व २६ व २७ येथील जलवितरण व्यवस्थेची देखभाल व दुरुस्ती करणे, सानपाडा सेक्टर-५ येथील रस्ते कच्चे असल्यामुळे परिसरात पाणी साचून नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याचे लक्षात घेऊन रस्त्यांची डांबरीकरण व सुधारणा करण्याच्या कांमास मंजुरी देण्यात आली आहे.
पामबीच रस्त्यालगत ई-प्रसाधनगृह बसवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता; मात्र महापौरांनी सुचविलेल्या कामाचा म्हणून प्रस्ताव हा सादर करण्यात आला होता. महापालिका अधिनियमामध्ये अशी तरतूद नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. नियमात तरतूद नसताना प्रस्ताव आणलाच कसा, असे म्हणून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले.