तीन महिन्यांत १२० कोटींचे प्रस्ताव महासभेच्या मंजुरीविना

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी एकही विकासकाम न राबवल्याचा प्रचार करत त्यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करणाऱ्या राजकीय व्यवस्थेमुळेच विकासकामे रेंगाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस येत आहे. गेल्या तीन महिन्यांत पालिका प्रशासनाने नागरी सुविधांचे १२० कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करून पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणले होते. मात्र, यातील महत्त्वाचे प्रस्ताव गुंडाळून ठेवण्यात आले तर काही प्रस्ताव सभेच्या मंजुरीसाठी पटलावरही ठेवण्यात आले नाहीत, असे समोर येत आहे. हे प्रस्ताव सभेच्या मंजुरीसाठी पाठवून ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यामुळे आता नियमानुसार पालिका आयुक्त हे प्रस्ताव थेट शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्याच्या तयारीत आहेत. तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणताना राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी ते विकासात अडथळा ठरत असल्याचा आरोप केला होता.  सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही प्रत्यक्ष तक्रार केली होती.  मुंढेंविरोधात सुरू असलेल्या फलकबाजीतही ते विकासाला मारक असल्याचे चित्र रंगवण्यात येत आहे. प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती उघड होत आहे.  विकासकामांचे तब्बल १२० कोटी रुपयांचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत कोणत्याही ठोस चर्चेविना स्थगित ठेवण्यात आल्याचे आता उघड होत आहे. बेलापूर-वाशी-ऐरोली या उपनगरांच्या त्रिकोणात वसलेल्या नवी मुंबईतील विविध विकासकामांचे प्रस्ताव अभियांत्रिकी, आरोग्य, स्वच्छता विभागाने तयार करून ते सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पाठविले असून त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे चित्र आहे. ऐरोली, महापे, घणसोलीतील रहिवाशांना पुरेशा दाबाने मोरबे धरणातील पाणी मिळावे यासाठी जलवाहिन्या टाकणे, रुग्णालयांमध्ये मेडिकल गॅस तसेच सोनोग्राफी, क्ष किरणसारख्या मूलभूत सुविधा पुरविणे शहरातील पर्यावरणासंबंधी महत्त्वाचा अहवाल मंजूर करण्यासारख्या प्रस्तावांचा समावेश आहे.

प्रस्ताव काय?

  • वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, पदपथांची निर्मिती, स्मशानभूमींची डागडुजी तसेच रुग्णालयांतसुविधा पुरविण्याच्या कामांचा यामध्ये समावेश आहे.
  • घणसोली विभागात ठाणे बेलापूर रस्त्यालगत शिवाजी फ्लोअर मिल येथून ऐरोली टी जंक्शन येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारला जावा हा महापौर सुधाकर सोनावणे यांनी मागणी केलेला प्रस्तावही अद्याप सर्वसाधारण सभेनेच गुंडाळून ठेवल्याचे चित्र आहे.
  • घणसोली, ऐरोली उपनगर तसेच झोपडपट्टी भागापर्यंत मोरबेचे पाणी नेता यावे यासाठी महापे ते दिघा नवी जलवाहिनी टाकण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एमआयडीसीकडून घेण्यात येणाऱ्या शटडाउन काळात ऐरोलीकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागू नये यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. परंतु हा प्रस्तावही प्रलंबित ठेवण्यात आला.

आपणच विकासाचे शिल्पकार आहोत, असा आव आणणे प्रशासकीय प्रमुखांना शोभत नाही. एखाद्या विषयावर सखोल चर्चा होत नसेल आणि आयुक्त उत्तर देण्यास हजर नसतील तर मान खाली घालून मंजुरी देणे योग्य नाही. त्यामुळे हे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.

जयवंत सुतार, सभागृह नेते