तुर्भे कचराभूमीच्या मुद्दय़ावरून गदारोळ; महासभा तहकूब

आयुक्तांविरोधातील असंतोष, महापौरांचे नाराजीनाटय़ त्यानंतरचा आयुक्तांविरोधातील अविश्वास प्रस्ताव या पाश्र्वभूमीवर मागे पडलेल्या  शहरातील विकासकामांना गुरुवारच्या महासभेत पुन्हा बगल देण्यात आली. तुर्भे येथील कचराभूमीवरून मुद्दय़ावरून गुरुवारी महासभेत गदारोळ झाला. नगरसेवकांनी अचानक आक्रमक रूप धारण करून महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांचा निषेध केला. जमिनीवर ठिय्या दिला आणि कार्यक्रमपत्रिका फाडून सभागृहात भिरकावल्या. अखेर महापौर सुधाकर सोनवणे यांनी महासभा तहकूब केली. मुख्यमंत्र्यांना भेटून या तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर २५ दिवसांनी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्वतच्या अधिकारात ५२ प्रस्ताव सभापटलावर आणण्यास मनाई केली. तब्बल दीड तास उशिरा महापौर व आयुक्त सभागृहात आले. तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महासभा सरू होण्यापूर्वीच बोलण्यास सुरुवात केली, मात्र महापौर सुधाकर सोनवणे यांनी शोक प्रस्ताव झाल्यावर बोलण्यास परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. शोक प्रस्ताव झाल्यानंतर नगरसेवकांनी तुर्भे कचराभूमीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र महापौर त्याकडे दुर्लक्ष करीत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी चर्चा करीत बसले होते. नगरसेवक अनंत सुतार, सुरेश कुलकर्णी, संगीता वास्के, राधा कुलकर्णी, राजेश शिंदे, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर हे सर्व पक्षीय संतप्त नगरसेवक अचानक महापौरांच्या व्यासपीठासमोर गेले. त्यांनी कार्यक्रमपत्रिका फाडून सभागृहात भिरकावल्या. काही नगरसेवकांनी जमिनीवर ठिय्या दिला. या वेळी भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या समोर येत घोषणाबाजी केली. नमते घेऊन महापौरांनी  मुख्यमंत्र्यांशी तातडीने बैठक घेण्याचे आदेश देत महासभा तहकूब केली.

तुर्भे क्षेपणभूमीला विरोध करण्यात स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृह नेते जे. डी. सुतार, अनंत सुतार, सुरेश कुलकर्णी आघाडीवर होते. या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केल्यावर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या दालनात बैठक घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधल्यावर सर्वपक्षीय नगरसेवक मंत्रालयाकडे रवाना झाले.

तुर्भे येथील कचराभूमीमुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, संसर्गजन्य आजार होत आहेत. त्यामुळे कचराभूमीला विरोध आहे. येथील ६० एकर जागेतील चार टप्पे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता नवीन ३८ एकर जागेत पुन्हा कचराभूमी सुरू करण्यात येणार आहे. याला रहिवाशांचा विरोध आहे.

–  सुरेश कुलकर्णी, नगरसेवक