|| संतोष जाधव

नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन 

सामाजिक भान राखणाऱ्या आणि अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन ‘नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. संस्था समाजातील तळागाळातील मुलांना योग्य आरोग्यविषयक व शारीरिक ज्ञान मिळवून देण्यासाठी गेली अनेक वर्षे शहरात झटत आहे. ‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे ब्रीद नजरेसमोर ठेवून संस्था आरोग्याचा वसा पुढे नेत आहे. डॉक्टरांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्वसामान्य लोकांना व्हावा, यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबवते.

एकीकडे समाजात डॉक्टरांना देव मानले जाते, तर दुसरीकडे याच समाजाच्या रोषालाही त्यांना अनेक वेळा सामोरे जावे लागते. परंतु वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना सातत्याने अद्ययावत ज्ञान देण्यासाठी ही संस्था सतत प्रयत्नशील असते. नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनच्या वतीने डॉक्टरांसाठी दर महिन्याला किमान एका वैद्यकीय विषयावर तज्ज्ञांचे व्याखान आयोजित केले जाते. हा उपक्रम गेली सात वर्षे विनामूल्य सुरू आहे. यात ९० पेक्षा अधिक व्याख्याने संस्थेने आयोजित केली आहेत.

संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. त्यात निरामय जीवन कसे साध्य करावे, याचे धडे दिले जातात. ६ मे २०१७ रोजी या संस्थे मार्फत ‘जेनेरिक औषधे’ या विषयावर केमिस्ट भवन, सानपाडा येथे वैद्यकीय सामाजिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषेदत डॉक्टर्स, केमिस्ट, शासकीय अधिकार आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले. डॉ. प्रशांत थोरात यांनी ही परिषद आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न  केले.

शाळकरी, तरुण मुले-मुली आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक असल्यास भविष्यात सदृढ, निरोगी, समृद्ध भारतास हातभार लागेल या हेतूने नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन कार्यरत आहे. विविध शाळांमध्ये, विशेषत: नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून या संस्थेमार्फत आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, प्रथमोपचार, लैंगिक शिक्षण या विषयांवर ५० पेक्षा अधिक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. महापालिका शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक-सामाजिक स्तर पाहता या मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याविषयी पालकांमध्ये उदासीनता दिसते. त्यामुळे मुले-मुली आरोग्याबरोबरच लैंगिक शिक्षणापासून कितीतरी दूर असतात. तरुण मुलींमध्ये पाळीबद्दल असणारे गैरसमज, समस्या दूर करण्यास नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉ. वंदना कुचिक तळमळीने काम करत आहेत. संस्थेच्या वतीने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकांच्या १० शाळांमध्ये हजारो मुलींकरिता लैगिक शिक्षण, विशेषत: पाळीदरम्यान घ्यायची स्वच्छता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांसाठी संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील ज्ञान केंद्रामध्ये ‘शालेय मुलींचे लैंगिक प्रबोधन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात डॉ. वंदना कुचिक यांच्यासह डॉ. मीनाक्षी कुऱ्हे, डॉ. नीलिमा पवार, डॉ. श्रेय आयरे, डॉ. स्वाती शेणई यांनी मार्गदर्शन केले. डॉ.अरुण कुऱ्हे संस्थेचे अध्यक्ष असून डॉ. किरण गोडसे, डॉ. श्रीराम कुलकर्णी या संस्थेचे सल्लागार आहेत.

पालकांचेही प्रबोधन

शालेय जीवनातच वैद्यकीय समज आली पाहिजे. म्हणूनच शालेय जीवनात मानवी शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव व त्यांची निगा याबरोबरच उत्तम आरोग्यासाठीचा मूलमंत्र देण्याचा प्रयत्न संस्था सातत्याने करत आहे. वैद्यकीय ज्ञानाची गरज फक्त शालेय विद्यार्थ्यांनाच असते असे नाही, काही वेळा पालकही अनेक बाबींविषयी अनभिज्ञ असतात. त्यामुळे पालकांचे आणि महिलांचे प्रबोधन करण्यासाठी संस्था मोफत कार्यशाळांचे आयोजन करते. हे सर्व प्रबोधनकार्य संस्थेतील डॉक्टर कोणत्याही आर्थिक लाभाविना करत आहेत.

santoshnjadhav7@gmail.com