मोडक्या खेळण्यांमुळे हिरमोड; देखभालीकडे पालिकेचे दुर्लक्ष

नवी मुंबईत पालिकेने २००हून अधिक उद्याने विकसित केली आहेत. विविध मोकळ्या जागांत हरितपट्टे फुलवले आहेत. उद्यानांमध्ये अद्ययावत सुविधाही दिल्या आहेत, मात्र देखभाल दुरुस्तीअभावी ही उद्याने दीनवाणी झाली आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकीकडे उद्यानांतील गर्दी वाढली असताना, उद्यानांतील मोडकी खेळणी, बंद पडलेल्या टॉय ट्रेन पाहून मुलांचा हिरमोड होत आहे. नवी मुंबई</strong>, पनवेल आणि उरणमधील उद्यानांतील समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आणि त्या संदर्भातील लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न..

  • रॉक गार्डन, नेरुळ

टॉयट्रेन, मानवी उत्क्रांतीची माहिती देणारे देखावे, वाद्यांच्या प्रतिकृती, आजोबा व लहान मुलांचा आकर्षक पुतळा येथे आहे. नैसर्गिक साधनांच्या साहाय्याने सजावट करण्यात आली आहे. उद्यनाला २ प्रवेशद्वारे असताना एकच उघडे असते. आयुक्त निवासाकडील प्रवेशद्वार कधीतरी उघडले जाते. टॉयट्रेन अनेक महिन्यांपासून बंद आहे. उद्यानातील मुलाच्या पुतळ्याचा एक हात तुटलेला आहे. तर वाद्यांच्या प्रतिकृतींचीही दुरवस्था झाली आहे. फुडमॉलमध्ये कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे येणाऱ्या मुलांचा हिरमोड होत आहे.

  • महात्मा गांधी उद्यान, पनवेल

पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृह नाही, सूचना फलक गंजलेले आहेत. तक्रार नोंदवही किंवा सूचना पेटी नाही. लहान मुलांसाठीच्या खेळण्यांपैकी अनेक खेळण्यांची मोडतोड झाली आहे. लाकडाचे ढिगारे पाहता हे उद्यान आहे की लाकडाची वखार हा प्रश्न पडतो. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागाच नाही.

उद्यनाच्या सौंदर्यीकरणासाठी आम्ही पूर्वीही प्रस्ताव मांडला होता. उद्यानात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, त्यामुळे मी पुन्हा आयुक्तांकडे महात्मा गांधी उद्यनाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव ठेवणार आहे.

 – प्रीती जॉर्ज म्हात्रे, नगरसेविका

  • राजीव गांधी उद्यान, ऐरोली

येथील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासन उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत आहे. जॉगिंग ट्रॅक पूर्णत: खराब झाला आहे. लाद्या खिळखिळ्या झाल्या आहेत. पदपथांची दुर्दशा झाली आहे. गतवर्षी खुली व्यायामशाळा सुरू झाली, मात्र अवघ्या १० दिवसांतच साहित्याची मोडतोड झाली. लगतच्या मैदानात उच्च दाब वाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या घातक ठरू शकतात. दोन ते तीनदा शॉर्टसर्किट झाल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेने जर शहरातील नागरिकांना उद्याने उपलब्ध करून दिली आहेत, तर त्या उद्यनांत उत्तम सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारीदेखील पालिकेची आहे. देखभाल होणे गरजेचे आहे.

 – नीलेश बाणखिले, उपाध्यक्ष, शहर मनसे उरण

विमला तलाव (साने गुरुजी बालोद्यान) व मोरा येथील लाल बहादूर शास्त्री या दोन उद्यानांतील खेळण्यांची मोडतोड झाली आहे. यातील साने गुरुजी बालोद्यानात सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी उद्यानातच रेती, खडी तसेच विटांच्या राशी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळण्यासाठी पुरेशी जागा राहिलेली नाही. ऐन मे महिन्यात हे काम सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तशीच काहीशी स्थिती लाल बहादूर शास्त्री उद्यानाचीही आहे. येथील घसरगुंडय़ा गंजल्या आहेत. या परिसरातील हे एकमेव उद्यान असल्याने मुलांना त्याचा वापर करता येत नाही.

सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे काम करता येत नाही, मात्र नंतर या उद्यानात सुधारणा करणार आहे. साने गुरुजी उद्यानातील सुशोभीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू आहे.

सायली म्हात्रे, नगराध्यक्ष, उरण

  • ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरुळ

येथे २.५ किमीचा जॉगिंग ट्रॅक आहे. व्यायामाच्या साहित्याची निगा न राखल्याने ती बिघडून निरुपयोगी झाले आहे. येथे एक तलावही आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अनेकदा दिवेही बंद असतात. येथे तलाव आणि विचारवंताचा पुतळा आहे. येथील सुरक्षारक्षकांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात छायाचित्रणासाठी आलेल्यांची गर्दी असते. प्रेमी युगुलेही येथे येतात.

जॉगिंग ट्रॅकनंतर येथे कोणतीही नवीन सुविधा दिलेली नाही. सुरक्षा, व्यायामाचे साहित्य व स्वच्छतागृहाबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते. येथे नौकानयनाची सुविधा दिल्यास चांगला प्रतिसाद लाभेल. सीसीटीव्ही लावण्यात यावेत. त्यामुळे नासधूस करणाऱ्यांना पकडणे सोपे जाईल.

स्वप्ना गावडे गायकवाड, नगरसेविका

  • वंडर्स पार्क, नेरुळ नेरुळ, सेक्टर १९ ए

टॉय ट्रेन, सात आश्चर्ये, ऑक्टोपस, क्रिकेट, अ‍ॅम्पिथिएटर, कारंजे, फुडमॉल ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. प्रवेशशुल्काव्यतिरिक्तही राइड्ससाठी शुल्क भरावे लागत असूनही येथे नेहमीच गर्दी असते. परंतु वारंवार बंद पडणारी टॉय ट्रेन, बिघडणारा ऑक्टोपस यामुळे छोटय़ांचा विरस होतो. दोनपैकी एकच तिकीट खिडकी खुली ठेवण्यात येत असल्यामुळे रांगेत ताटकळावे लागते. रात्री ८ नंतर प्रवेशच देण्यात येत नाही. सुटीत वेळ वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. शाळा साधारण १५ जूनच्या आसपास सुरू होत असल्यामुळे वंडर्स पार्क १ जूनऐवजी १५ जूनपासून बंद ठेवावे, असेही पालकांचे म्हणणे आहे.

वंडर्स पार्कमधील टॉयट्रेन तसेच ऑक्टोपसमध्ये वारंवार होणारे बिघाड दूर करण्यासाठी प्रश्नासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. तिकीट खिडक्यांवर अधिक कर्मचारी नेमावेत, तिकीट देण्याच्या वेळेतही वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावर्षी हे पार्क १ जूनपासून नाही तर १५ जूनपासून बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी सभागृहात केली आहे.

रवींद्र इथापे, सभागृह नेता

  • कोपरखैरणेत गैरसोयी

या नोडमध्ये ३३ उद्याने आहेत, मात्र यातील एकही उद्यान सुस्थितीत नाही आणि गेल्या दहा वर्षांपासून हीच अवस्था आहे. उद्यान विकसित केले की त्याकडे पाहिलेही जात नाही. सिडकोने एकाच भूखंडावर उद्यान आणि मैदान असे दोन भाग केले आहेत. अशी तीन उद्याने आणि अन्य ३० उद्याने आहेत. यातील बहुतेक उद्यानांच्या संरक्षक भिंती मोडकळीस आल्या आहेत. रात्री गर्दुल्ले, मद्यपी आणि प्रेमी युगुले असतात. उद्यानात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सुरक्षारक्षक नाही. ३३ उद्यनांसाठी अवघे ११ सुरक्षारक्षक आणि सुमारे ४५ कामगार आहेत, मात्र एकाच कामगाराकडे अनेक उद्याने दिली जातात. गत वर्षी उन्हाळ्यात उद्यानांतील हिरवळ सुकली होती, त्यामुळे एचटीपीच्या (प्रक्रिया केलेल्या ) पाण्याची मागणी करण्यात आली. केवळ सेक्टर २३ येथील उद्यानाला पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे याच उद्यानात थोडी फार हिरवळ दिसते, अन्यत्र उजाड झाले आहे.

कोपरखैरणेत एकही उद्यान सुस्थितीत नाही. केवळ आश्वासनांवर आश्वासने दिली जातात. उद्यान बंद करणे आणि उघडणे याची नियमानुसार अंमलबजावलीसुद्धा केली जात नाही.

देवीदास हांडे पाटील, नगरसेवक

कोपरखैरणेतील सर्व उद्याने नव्याने विकसित करण्यात येणार आहेत. सध्या सर्वच उद्यानांची दुरुस्ती करण्यात येत आहे. नोव्हेंबपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

विजय कांबळे, उद्यान अधीक्षक

  • घणसोलीत दयनीय अवस्था

सिडकोकडून घणसोली नोड सर्वात शेवटी हा नोड हस्तांतरित झाल्याने विकासकामांबाबत सर्व खापर सिडकोच्या माथ्यावर फोडण्यात येत आहे. घणसोली नोड मध्ये आठ उद्याने आहेत. हस्तांतरानंतर सेक्टर ४ येथील उद्यान विकसित करण्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. याच मैदानाची अवस्था त्यातल्या त्यात ठीक आहे, अन्यत्र उदासीनता दिसते. घाणसोलीत उत्तुंग इमारती मोठी रस्ते असले तरी उद्याने नाहीत. जी आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे. तुटलेली खेळणी, बाक, निखळलेले गेट अशी एकंदरीत अवस्था आहे.

घणसोली नोड पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे. एवढी र्वष सिडकोने केवळ भूखंड विकणे एवढे काम केले आता तरी येथील उद्याने लवकरात लवकर विकसित होतील, अशी अपेक्षा आहे.

द्वारकानाथ भोईर, नगरसेवक

नेरूळ येथील एका अद्ययावत उद्यानात कारंजे बसवण्यासाठी ३० लाखांची मागणी करण्यात आली आहे, हे अयोग्य नाही, मात्र घणसोली नोडमधील उद्यानासाठी ना प्रशासन काम करत आहे ना लोकप्रतिनिधी धडपडताना दिसत आहेत.

अनिल बानुसे, रहिवासी

लायन गार्डन, पनवेल

उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तक्रार नोंदवही किंवा सूचना पेटी नाही. अनेक खेळण्यांची मोडतोड झाली आहे. बाकांचा अभाव दिसतो. खेळणीही गंजलेली आणि धोकादायक झाली आहेत. लोकवस्तीच्या मध्यभागी असल्याने विरंगुळ्याचे एकमेव ठिकाण आहे.

उद्यानाची अवस्था पाहता संपूर्ण उद्यानाचा कायापालट करण्याची मागणी मी स्वत: महासभेत करणार आहे.

मुकीत काझी, नगरसेवक

  • हुतात्मा स्मारक उद्यान, पनवेल बाजारपेठ

नागरिकांची वर्दळ पाहता बाक अपुरे आहेत, एकमेव पाणपोई असून तेथील अस्वच्छता पाहता नागरिक बाटलीबंद पाणी घेतात. खेळाचे साहित्य जुनाट झाले असून त्याची नीटशी रंगरंगोटीही केलेली नाही. उद्यानात गर्दी होत असल्याने जागा अपुरी पडते. तक्रार नोंदवही किंवा सूचना पेटीही नाही.

उद्यानात पाण्याची सोय नव्हती. मी स्वखर्चाने ही सोय केली. ज्या सोयी उद्यानात नाहीत त्या मिळवून देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन, येत्या आठवडय़ात लोखंडी बाकांच्या संख्येत वाढ केली जाईल.

राजू सोनी, नगरसेवक