नगरसेवक अशोक गावडे यांचा स्थायी समितीत इशारा

आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांना पदावरून निलंबित करण्याच्या मागणीवरून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक गावडे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच विविध पदांवरील अधिकारी, कर्मचारी हे गेल्या १० वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असून त्यांनादेखील प्रशासनाने हटवावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

१५ दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बठकीत आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांना निलंबित करण्याची मागणी नगरसेवक अशोक गावडे यांनी केली होती. तसेच पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच पदावर कसे घेण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित केला होता. यावेळी प्रशासनाने त्यांची विभागीय चौकशी सुरू असून त्याचा अहवाल नगरसेवक गावडे यांना देण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले होते. त्या अहवालाची प्रतही नगरसेवक अशोक गावडे यांना देण्यात आली होती. त्यावर चर्चा करताना नगरसेवक अशोक गावडे यांनी पुन्हा प्रशासनाला जाब विचारला. यावर पालिकेचे उपआयुक्त किरण यादव यांनी तत्कालीन आयुक्तांनी राजीनामा परत घेऊन त्यांना सेवेत रजू केल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच विभागीय चौकशीनंतर त्यांना शिक्षा सुनावल्याचेही स्पष्टीकरण दिले. प्रशासनाच्या या उत्तराने संतापलेल्या नगरसेवक गावडे यांनी याविषयी थेट न्यायालयातच याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. तसेच आरोग्य विभागात एकाच पदावर दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबतही विचारणा केली. यावर एकाच पदावर कोणताही अधिकारी कार्यरत नसून त्यांची अंतर्गत बदली केली जात असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिले.

कोपरखरणे येथील माता बाल रुग्णालयाला पर्याय काय?

कोपरखरणे येथील माता बाल रुग्णालय हे एप्रिल २०१५ पासून बंद आहे. माता बाल रुग्णालय बंद केल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवीदास हांडे पाटील यांनी केला.

२०१२ साली कोपरखरणे येथील माता बाल रुग्णालयाची इमारत अतिधोकादायक असल्याचे घोषित केल्यानंतर प्रशासनाने त्याचवेळी दुरुस्तीचा निर्णय का घेतला नाही, याचीही स्थायी समितीत प्रशासनाकडे विचारणा आली. तसेच या रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सर्वसाधरण सभेत फेटाळल्यानंतर हे रुग्णालय नव्याने बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार का केला नाही, असा सवालही उपस्थित केला गेला. यावर पालिकेचे शहर अंभियता मोहन डगांवकर यांनी तुभ्रे येथील माता बाल रुग्णालयाची डागडुजी सुरू असून त्यांचे काम झाल्यावर कोपरखरणे येथील माता बाल रुग्णालयाचा विचार करण्यात येईल, स्पष्टीकरण दिले. यावर नगरसेवक हांडे-पाटील यांनी तुभ्रे येथील माता बाल रुग्णालयाच्या डागडुजीचा आणि कोपरखरणे येथील माता बाल रुग्णालयाचा काय संबध? अशी विचारणा केली. यावर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. तर स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनीदेखील आठवडय़ाभरात यासंबंधी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

शासनाकडून मिळालेला कोणताही निधी परत जात नसून राष्ट्रीय कार्यक्रमांमधून मिळणारे हे अनुदान त्यांच्या अटी आणि शर्थीनुसारच खर्च करण्यात येते. त्यामुळे निधी परत जात नाही. उलट पुढील वर्षांत त्याचा वापर केला जातो.

डॉ. दीपक परोपकारी, आरोग्य अधिकारी, मनपा.