News Flash

फुटबॉल स्पर्धेसाठी महामार्ग पालिकेकडे?

नवी मुंबईतून शीव-पनवेल हा राज्य मार्ग जातो. त्याच्या दुतर्फा अनेक पंचतारांकित हॉटेल आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका

पंचतारांकित हॉटेल्समधील मद्यगृहासाठी खटाटोप; आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे नगरविकास विभागाला निर्देश

शहरात ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या १७ वर्षांखालील ‘फिफा’ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी देश विदेशातील लाखो प्रेक्षक येणार आहेत, या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील पंचतारांकित हॉटेल्समधील मद्यगृहे सुरू ठेवता यावीत, यासाठी शीव-पनवेल व सीबीडी-उरण या मार्गाचे आरक्षण बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, आरक्षण बदलासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिल्याचे समजते.

देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यगृहे बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आठ महिन्यांपूर्वी दिला. त्यामुळे शीव-पनवेल महामार्ग, शीळफाटा मुंब्रा मार्ग, सीबीडी उरण आम्रमार्ग या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील १३० मद्यगृहांना टाळे लागले आहे. राज्यात काही ठिकाणी सरकारने राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे आरक्षण रद्द (डी नोटीफिकेशन) केले आहे. ते रस्ते स्थानिक प्राधिकरणांच्या ताब्यात दिले आहेत. त्यामुळे येथील हॉटेल उद्योग अबाधित आहे. महामार्गाचे आरक्षणच बदलून टाकण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश या रस्त्यांना लागू होणार नाही. नवी मुंबईत ६ ऑक्टोबरपासून १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक होत आहे. त्यातील उपांत्य सामना नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर होणार असून सराव सामने वाशी, नेरुळ व सीबीडी येथे होणार आहेत. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या स्पर्धेच्या तयारीसाठी आढावा बैठकीवर भर दिला आहे. देश-विदेशांतील दीड ते दोन लाख प्रेक्षक नवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांत राहणार आहेत.

नवी मुंबईतून जाणाऱ्या शीव-पनवेल राज्य महामार्गातील पाच किलोमीटर अंतरात आणि जेएनपीटी बंदराकडे मोठय़ा प्रमाणात वाहतूक होणाऱ्या सीबीडी-उरण मार्गावरील ६०० मीटर मार्गाच्या परिसरात मद्यविक्री बंदी आहे. हीच स्थिती शिळफाटा-मुंब्रा महामार्गावरील महापे ते अडवली भूतवली गावाजवळील रस्त्याची आहे. सध्या सर्वाधिक वर्दळीचा असलेला ठाणे-बेलापूर महामार्ग मात्र राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गात येत नसल्याने या मार्गावर मोठय़ा प्रमाणात असलेली मद्यगृहे सुरू आहेत. शीव पनवेल, शिळफाटा मुंब्रा आणि आम्रमार्ग या तीन रस्त्यांवरील ४० हॉटेल्सना या बंदीचा फटका बसला आहे. यातील १०-१२ हॉटेल्समध्ये स्पर्धेनिमित्त येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. फिफा स्पर्धेसाठी येणाऱ्या देश-विदेशांतील प्रेक्षकांनी या हॉटेलांत ऑनलाइन आरक्षण केले आहे, मात्र मद्यबंदीमुळे काही हॉटेलांच्या आरक्षणावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. मद्यपानाची व्यवस्था नसल्यामुळे काही पर्यटकांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळविला आहे. नवी मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांनी ही बाब नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशनास आणली.

नवी मुंबईतून शीव-पनवेल हा राज्य मार्ग जातो. त्याच्या दुतर्फा अनेक पंचतारांकित हॉटेल आहेत. शहरात विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होत आहे. त्यानिमित्त हजारो प्रेक्षक येणार आहेत. त्यामुळे या हॉटेलमधील खोल्यांचे आरक्षण सुरू झाले आहे, पण मद्याची व्यवस्था नसल्याने आरक्षणाला फटका बसला आहे. महामार्गाचे आरक्षण बदलण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर सोपविला आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन फिफा स्पर्धेपूर्वी हा मार्ग वगळण्याची विनंती केली आहे.

– दयानंद शेट्टी, अध्यक्ष, नवी मुंबई हॉटेल असोशिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 4:30 am

Web Title: navi mumbai hotel owners demand cm to change highway reservations
Next Stories
1 विमानतळ निविदा अडचणीत?
2 नवी मुंबईत २८ नवीन सिग्नल
3 विसर्जनासाठी चोख व्यवस्था
Just Now!
X