न्हावाशेवा ते उलवा दरम्यान ५.८ किलोमीटरचा मार्ग बांधण्याची सिडकोची योजना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाची योजना सिडकोने तयार केली आहे. त्यासाठी ७७१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून चार महिन्यांत तांत्रिक व आर्थिक पात्रता सिद्ध झाल्यानंतर हे काम जाहीर केले जाणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाअंर्तगत राज्य शासनाने आखलेल्या शिवडी-न्हावाशेवा या २२ किलोमीटरच्या किनारी मार्गाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडणारा हा मार्ग २०२१ पर्यंत पूर्ण व्हावा, यासाठी सिडकोने ही निविदा प्रसिद्ध केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई व नवी मुंबई अधिक जवळ येणार असून विमानतळापर्यंतचा प्रवास विनाअडथळा होणार आहे.

राज्य शासनाने मुंबईतील वाहतूक कोंडीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात १४ हजार २६२ कोटी रुपये खर्चाच्या शिवडी-न्हावाशेवा या महत्त्वाकांक्षी किनारी मार्गाचा समावेश आहे. एप्रिलमध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा २२ किलोमीटर लांबीचा सहा पदरी सागरी मार्ग उरण येथील न्हावाशेवा गावाच्या शिवाजी नगर भागात पूर्ण होणार आहे. त्यापुढे त्याच गुणवत्तेचा महामार्ग तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गाबरोबच हा मार्ग पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथ: सरकारच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या किनारी मार्गाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे  सिडकोनेही न्हावाशेवा ते उलवा तळघर या दरम्यान ५.८ किलोमीटर लांबीच्या छोटय़ा सागरी मार्गाचे काम हाती घेतले आहे.

नवी मुंबईला जोडणारा हा किनारी मार्ग ११ किलोमीटरचा आहे पण विमानप्रवाशांची गरज लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. शिवाजीनगर ते तळघपर्यंत आलेल्या या मार्गपुढे तळघर ते विमानतळ हा १.२ किलोमीटरचा वेगळा मार्ग बांधण्यात येणार आहे. जेणेकरून मुंबईमधून निघणाऱ्या विमान प्रवाशांना विनाअडथळा प्रवास केवळ अर्धा तसात पूर्ण करता येणार आहे. यासाठी ७७१ कोटी रुपये खर्च होणार असून तो येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याच काळात २२ किलोमीटर लांबीच्या किनारी मार्ग पूर्ण केला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

सिडकोच्या या मार्गातही तीन खाडीपूल असून एक खाडीपूल १.२ किलोमीटर अंतराचा आहे तर अन्य दोन खाडीपूल ६६० मीटर लांबीचे आहेत. या मार्गात खारफुटींचा अडथळा असून त्यासाठी बांधकाम परवानगी मिळावी यासाठी सिडकोने प्रस्ताव सादर केले आहेत. येत्या सहा महिन्यांत पर्यावरण विभागाकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सिडकोचा हा आणखी एक प्रकल्प मार्गी लागणार आहे.

पालिकेनेही शहराबाहेरून एक खाडीपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सिडकोने पामबीचचा विस्तार करताना कोपरखैरणे ते ऐरोली या पाच किलोमीटर मार्गाची मुहूर्तमेढ रोवली आहे, मात्र गेली बारा वर्षे हा मार्ग खारफुटीमुळे रखडला आहे. या मार्गाचा खर्च आता वाढला असून तो एक हजार कोटीपर्यंत गेला आहे. सिडको तयार करत असलेला उरण ते उलवा हा खाडीमार्ग या सर्व मार्गाना जोडला जाणार आहे. या सर्व मार्गामुळे नवी मुंबई शहरातील अंर्तगत रस्त्यावर वाढलेला वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

शिवडी ते न्हावाशेवा या किनारी मार्गाला चालना मिळाली आहे. याच काळात उरण ते नवी मुंबई सागरी मार्ग तयार करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. हा ११ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे पण विमानतळासाठी साडेपाच किलोमीटरचा मार्ग प्राधान्याने बांधण्यात येणार आहे. कंत्राटदारांची पात्रता सिद्ध झाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल. याला आणखी चार ते पाच महिने लागणार आहेत. – केशव वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको