News Flash

नवी मुंबई विमानतळाची ५० टक्के मालकी अदानी समूहाकडे! मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ५० टक्के मालकीहक्क आता जीव्हीकेकडून अदानी समूहाकडे हस्तांतरीत झाले आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून मोठा वाद निर्माण झालेला असताना यादरम्यान राज्य मंत्रिमंडळात नवी मुंबई विमानतळासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जीव्हीकी एअरपोर्ट डेव्हलपर लिमिटेड या कंपनीकडे असणारे ५०.५ टक्के समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड यांनी घेतले आहेत. मालकी हक्कातील या बदलास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प नियंत्रण व अंमलबजावणी समितीने निर्देशित केल्याप्रमाणे या मालकी हक्कात बदल करण्यास आज बैठकीत मान्यता देण्यात आल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

२०२३-२४ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार!

नवी मुंबई येथे ११६० हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. यातील ११६० हेक्टर जमीनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे पूर्ण झाली आहेत. या विमानतळाचा पहिला टप्पा २०२३-२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहेत.

सिडको संचालक मंडळाचीही मान्यता

या विमानतळाच्या बांधकामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची सवलतधारक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या कंपनीच्या मालकी हक्कामध्ये नुकताच बदल झाला असून यापूर्वी या कंपनीमध्ये ५०.५ टक्के सहभाग असणाऱ्या जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर लि. या कंपनीचे समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. यांनी घेतलेले आहेत. या बदलास केंद्र शासनाच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. तसेच सिडको संचालक मंडळाने देखील मालकी हक्काच्या बदलास मान्यता देण्याचा ठराव केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाने देखील मालकी हक्क बदलास मान्यता दिली आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद

विमानतळ नामकरणाचा मुद्दा

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव द्यावं, अशी भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 9:45 pm

Web Title: navi mumbai international airport 50 percent ownership transferred to adani group from gvk pmw 88
Next Stories
1 वाहतूक पर्यायी मार्गानी, कोंडीची भीती
2 शंभरऐवजी २० मेट्रिक टन प्राणवायू निर्मितीला प्राधान्य
3 शहरात आज पाणी नाही
Just Now!
X