विमानतळ भरावाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सपाटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. मात्र यासाठी करण्यात येत असलेल्या भरावामुळे पावसाळ्यात परिसरातील काही गावांना पुराचा फटका बसला होता. यावर्षी भरावाचे काम अधिकचे झाल्याने दापोली, पारगाव, डुंगी, ओवळे या चार गावांतील ग्रामस्थ धास्तावले आहेत. त्यांनी तातडीची बैठक घेत ‘सुरक्षेची हमी द्या! मगच भराव करा’ अशी भूमिका घेत भरावाचे काम बंद पाडले आहे.

गेल्या वर्षी भरावाचे काम सुरू होताच पहिल्याच पावसात डुंगी गावात पाणी शिरले होते. त्यामुळे गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील इतर गावांनाही पुराची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे भरावयाचे काम बंद पाडले आहे. यासंदर्भात पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सिडकोचे अधिकारी व ग्रामस्थ प्रतिनिधी यांची बैठक पार पडली.

दापोली गावाजवळ भरावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. विमानतळ परिसरात असणाऱ्या नदीचा नैसर्गिक स्रोत बंद करण्यात आला असून, नवीन कालवा सिडकोच्या माध्यमातून काढण्यात येत आहे. या नवीन कालव्याचे काम पूर्ण झाले नाही. शिवाय सपाटीकरणासाठी स्फोट केल्यानंतर खडी गावाच्या दिशेने आणून दापोली जवळील पारगाव, डुंगी येथे टाकली जात आहे. ही खडी टाकली तर सद्य:स्थितीत तिथे जे गाव आहे ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत कालव्याचे काम होत नाही तोपर्यंत पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करायला नको होता, असे म्हणणे यावेळी ग्रामस्थांनी मांडले. सिडकोने पहिल्यांदा पाण्याचा नैसर्गिक स्रोत खुला करावा. मग नवीन कालवा काढावा. तसेच जोपर्यंत ग्रामस्थांना जीवित किंवा वित्तहानी होणार नाही असे सिडको लिहून देत नाही, तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ  देणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली आहे. सिडकोच्या पुढील भूमिकेची ग्रामस्थ पुढील चार दिवस वाट पाहणार आहेत.

४ दिवसांत सिडकोकडून काय उत्तर येतंय यानंतर काम सुरू करण्यास सुरुवात करण्याची परवानगी देऊ ही भूमिका दापोली, पारगाव, डुंगी, ओवळे या चार गावांनी घेतली आहे. विमानतळ भरावामुळे आमच्या गावातही डुंगीसारखी पूर परिस्थिती निर्माण होऊ  शकते, त्यामुळे आमचे विस्थापन करावे किंवा इतर प्रकल्पग्रस्तांप्रमाणे घराचा तीनपट मोबदला द्यावा.  आदेश नाईक, ग्रामस्थ