कमीत कमी वाहने रस्त्यावर येतील यासाठी प्रयत्न

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवार, २४ जून रोजी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या काळात नवी मुंबईतून जाणारा शीव-पनवेल मार्गावरील बेलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सर्व वाहतूक शीळफाटा मार्गे वळविण्यात येणार आहे. मात्र यामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. हे टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून कमीतकमी वाहने रस्त्यावर येतील यासाठी नियोजन आखण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

मागील आठ दिवसांपासून पोलिसांकडून विविध माध्यमांतून शक्यतो विनाकारण वाहने रस्त्यावर येऊ  नयेत यासाठी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असून विविध संघटनांशीही चर्चा करण्यात आली आहे. एफएम रेडिओच्या माध्यमातूनही आवाहन करण्यात येत आहे. बुधवारपासूनच सिडको भवन परिसरात सुरक्षा अडथळे लावण्यात आले आहेत. तर आंदोलकांनी मागणीसाठी लागण्यात आलेले फलक व झेंडही पोलिसांनी काढून टाकले आहेत.

या मोर्चात मोठा जनसमुदाय उतरणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद ठेवण्यात येणार आहे. या परिसरात फक्त कार्यालयीन कामासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अंतर्गत वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे.  या परिसरातून दररोज किमान १५ हजार लहान-मोठय़ा वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे ही वाहतूक वळविण्यात आली आहे.

मुंबईतून येणारी व मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक शीळफाटा मार्गे वळविण्यात आल्याने या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या २४ जून अल्प असेल असे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. पोलिसांनी टॅक्सी युनियन, खासगी टॅक्सी वाहतूक, ओला-उबेर चालकांच्या संघटनांशी चर्चा केली आहे. २४ तारखेला अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त या भागातील भाडे घेऊ  नये अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. याशिवाय एमआयडीसीतील वाहतूकही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असा प्रकार जड अवजड वाहनांसह हलकी वाहनेही कमीतकमी रस्त्यावर यावीत असे प्रयत्न सुरू असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.

२४ जून रोजी बेलापूर भागातून कुठल्याही वाहनाने प्रवास करू नये या आवाहनासाठी समाजमाध्यमांबरोबर प्रसिद्धी माध्यमे आणि एफएम रेडिओच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. एमआयडीसीसह विविध वाहतूक संघटनांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आलेल्या मार्गावर कमी वाहने असतील. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही. या मार्गावर वाहतूक पोलीसही कार्यरत असतील. त्यामुळे गैरसोय होऊ दिली जाणार नाही.

– पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतूक शाखा, नवी मुंबई</strong>