18 January 2019

News Flash

लोखंड बाजाराला समस्यांचा गंज

आशिया खंडातील मोठा बाजार म्हणून लोखंड-पोलाद बाजाराची ओळख आहे.

कळंबोली येथील लोखंड बाजारातील रस्त्यांवर दर पावसाळ्यात मोठे खड्डे पडतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येतात. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर)

सीमा भोईर, नवी मुंबई

सिडको, बाजार समितीत हस्तांतरवाद; पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव

सिडको आणि लोह-पोलाद बाजार समितीच्या वादात कळंबोली येथील लोखंड बाजार समस्यांनी गांजला आहे. बाजार हस्तांतरित केल्याचा दावा सिडकोने केला असून काही भाग सिडकोकडे तर काही भाग बाजार समितीकडे आहे, असे बाजार समितीचे म्हणणे आहे. या वादात लोह-पोलाद बाजाराला मात्र अनेक समस्यांनी ग्रासले असून, त्याची वाटचाल भंगार बाजाराकडे सुरू झाली आहे.

आशिया खंडातील मोठा बाजार म्हणून लोखंड-पोलाद बाजाराची ओळख आहे. मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी लोखंड-पोलाद बाजार नवी मुंबईतील कळंबोली येथे स्थलांतरित करण्यात आला आणि तो भूखंड सिडकोने विकसित केला. त्यानंतर बाजार समिती अस्तित्वात आली. मात्र बाजार समितीसाठी जो आराखडा होता त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. कळंबोली येथील ३०२ हेक्टर जमिनीवर १२५, २५०, ४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकारांचे १९६० भूखंड पाडण्यात आले. सिडकोने भाडेकरार करून ते भूखंड १९८० मध्ये व्यापाऱ्यांना दिले.

सिडकोने दुर्लक्ष केल्यामुळे तिथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. बागेसाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करून गॅरेज आणि इतर दुकाने थाटण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर कुल्र्यातील भंगारवाल्यांनीही कळंबोलीतील लोखंड बाजारात आपले बस्तान बसवले आहे. कळंबोलीतील लोखंड बाजारातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे तिथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका परराज्यांतून आलेल्या वाहनचालकांनाही बसत असून व्यापारी, वाहतूकदार हवालदिल झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांवरही मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकही हैराण आहेत.

लोखंड-पोलादबाजार परिसरात विमा संकुल, डिस्मा सोसायटी, स्टील चेंबर, एसीसी सिमेंट, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय, महानगर टेलिफोन निगम मर्यादितचे कार्यालय, ‘महावितरण’चे उपकेंद्र अशा महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे नागरिक आणि वाहनांची नेहमीच वर्दळ असते. लोखंड बाजारामुळे येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक व्यावसायिक आहेत. पथदिवे नसल्याचा सर्वाधिक फटका परराज्यांतील वाहतूक व्यावसायिकांना बसतो. अंधाराचा फायदा घेऊन वाहनांमधील माल आणि वाहनचालकांना लुटण्याच्या घटना घडतात. दुकाने आणि परिसरातील घरांमध्येही चोऱ्या होत असल्याने नागरिक आणि व्यापारीही त्रासले आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीही होते. कोटय़वधींची उलाढाल असलेला हा परिसर अंधारात असल्याने रहिवासी, व्यापारी आणि वाहतूक व्यावसायिक लोखंड बाजार व्यवस्थापन, सिडको आणि ‘एमएमआरडीए’च्या नावाने बोटे मोडत आहेत. सिडको आणि पोलाद-लोखंड बाजार समितीच्या हस्तांतर वादात बाजार समितीला अवकळा आली आहे.

लोह-पोलाद बाजार समितीला हस्तांतरित करावा, असा करार सिडकोच्या माध्यमातून करण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात अद्याप हस्तांतर झाले नसून सर्व कामे सिडकोच्याच माध्यमातून होत आहेत.

विकास रसाळ, लोखंड बाजार समिती

लोखंड बाजार २०११मध्ये बाजार समितीकडे हस्तांतरित करण्यात आला. फक्त बाह्य़ रस्त्याचे काम सिडकोकडून केले जाणार होते. ते झाले आहे. अंतर्गत रस्ते आणि बाकीच्या सोयी-सुविधा पुरविणे हे बाजार समितीचे काम आहे.

गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, सिडको

First Published on June 13, 2018 1:10 am

Web Title: navi mumbai iron market