नवी मुंबई :  ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले असून ते राज्यातील एकमेव शहर आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे.

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत तीन वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून शहराची पाहणी करण्यात आली होती. यात कागदपत्रांसह शहरातील विविध स्थळांना अचानक भेटीही देण्यात आल्या होत्या. कचऱ्याचे संकलन व वाहतूक पद्धती, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया याबाबतही पाहणी करण्यात आली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता या पथकांनी विविध ठिकाणांना भेटी देत नागरिकांची मतेही जाणून घेतली होती.

या सर्व पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला असून नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला आहे. देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश असून राज्यातील एकमेव शहर आहे. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता. त्याचप्रमाणे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांकही मिळवला आहे.

याचे श्रेय दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारापासून ते स्वच्छतेविषयी जागरूक प्रत्येक नवी मुंबईकरांचे आहे. स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन आता शहर आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने करोनाची साखळी खंडित करण्यासाठी घरातच थांबून व सामाजिक अंतर राखून आपले योगदान द्यावे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त