राज्यात लक्षवेधी ठरू पाहणाऱ्या नवी मुंबई महापौर निवडणुकीत भाजपाने केलेल्या शिवसेनेच्या कोंडीमागे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांची खेळी असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या दिवशीच काढलेल्या ‘घोटाळेबाज भाजप’ पुस्तिकेवरून नाराज झालेल्या भाजपच्या नेत्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेला साथ न देण्याचा निर्णय घेतला. हे एक कारण असले तरी भाजपने शिवसेनेला साथ देऊ नये यासाठी राज्यातील भाजप नेत्यांवर दिल्लीतून दबाव आल्याची चर्चा आहे. एका बडय़ा उद्योजकाच्या माध्यमातून दिल्लीहून हा संदेश राज्यातील नेत्यांना दिला गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्या संदर्भातील चर्चा समाजमाध्यमांवरही रंगली आहे.

दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेची तिजोरी (स्थायी समिती) ताब्यात घेणाऱ्या शिवसेनेने यंदाचे महापौरपद काबीज करण्यासाठी व्यहूरचना केली होती. राष्ट्रवादीतील पाच आणि दोन अपक्षांची जुळवाजुळव झाल्यानंतर काँग्रेसचे सात नगरसेवक शिवसेनेला पाठिंबा देणार होते. यात भाजपाच्या सहा नगरसेवकांची सोबत गृहीत धरण्यात आली होती. त्यामुळे भाजपाचे चार नगरसेवक शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विजय चौगुले घेऊन फिरत होते. त्यामुळे चौगुले यांनी ५७ नगरसेवकांचे गणित जुळवून आणले होते. भाजपाने अधिकृत पाठिंबा दिला नसता तरी भाजपाचे चार नगरसेवक वेगळा गट तयार करून शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत होते. त्यामुळे भाजप नेतृत्वाने महापौरपदाचे तगडे उमेदवार चौगुले यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच लांब ठेवले. यात मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून त्यांनी चौगुले यांना उमेदवारी अर्ज न भरण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून चौगुले यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही.

काँग्रेसचे सात नगरसेवक चौगुले यांच्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नाईक यांना मिळाली होती. काँग्रेसने साथ सोडल्यास आणि पाच अपक्ष नगरसेवकही शिवसेनेला मिळाल्यास ही निवडणूक जिंकणे राष्ट्रवादीसाठी कठीण होते. शिवसेनेचे आधारस्तंभ असलेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबाच मिळाला नाही तर शिवसेनेच्या शिडातील हवाच निघून जाईल, हे ओळखून नाईक यांनी राज्यातील नेतृत्वावर दिल्लीवरून दबाव आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने महापौरपदाचा अर्ज न भरता शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबाही न देण्याचा व्हिप बजावल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाचे सहा नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपातील मतभेद हे नवी मुंबई महापौरपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरणारे असले, तरी यामागे नाईक यांनी खेळलेली खेळी तितकीच महत्त्वाची असल्याची चर्चा आहे.