News Flash

महापौर राष्ट्रवादीचाच?

राष्ट्रवादीने ५७ नगरसेवकांच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याची तयारी केली होती.

० सदस्य असलेल्या काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी उपमहापौरपदासाठी अर्ज केल्यामुळे निवडणुकीतील रंजकता कायम आहे

विजय चौगुले रिंगणात न उतरल्याने शिवसेनेचा पराभव अटळ; उपमहापौरपदासाठी काँग्रेसमधून दोघांचे अर्ज

नवी मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेचे तगडे दावेदार मानले जाणारे विरोधी पक्षनेते विजय चौगुले मैदानातच न उतरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही शर्यत सोपी झाली आहे. मात्र १० सदस्य असलेल्या काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी उपमहापौरपदासाठी अर्ज केल्यामुळे निवडणुकीतील रंजकता कायम आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयवंत सुतार व शिवसेनेच्या वतीने सोमनाथ वास्कर यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरले. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला, मात्र त्याच वेळी काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी त्यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचाही अर्ज भरला. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. महापौरपद मिळवण्यासाठी ५६चा आकडा गाठणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे ५२ नगसेवक, ५ अपक्ष आणि १० काँग्रेस नगरसेवकांच्या जोरावर हा आकडा गाठण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.

राज्यातील शिवसेना-भाजपमधील शीतयुद्धाची झळ आणि काँग्रेसच्या १० नगरसेवकांतील दुफळी यामुळे नवी मुंबई महापालिकेचे महापौरपद राखण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग खुला झाला आहे. या पदासाठी गेले तीन महिने शक्य ते सर्व डावपेच खेळणारे शिवसेनेचे विजय चौगुले यांची गणिते चुकल्यामुळे त्यांनी शुक्रवारी या पदासाठी अर्ज भरला नाही. अडीच वर्षांपूर्वी पाच अपक्ष व दहा काँग्रेस नगरसेवकांच्या जोरावर नवी मुंबई पालिकेतील सत्ता टिकविण्यात यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून यंदा महापौरपद जाते की काय, असे चित्र निर्माण झाले होते, मात्र सेना-भाजपमधील राज्याच्या स्तरावरील कटुता राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आणि त्यांचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. गेली अडीच वर्षे महापौरपदी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होता, मात्र पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली नाराजी, काँग्रेसच्या दहा नगरसेवकांनी दिलेले पाठिंब्याचे आश्वासन, मित्रपक्ष भाजपची गृहीत धरलेली साथ आणि पाच अपक्ष नगरसेवकांतील दोन नगरसेवकांनी सोबत राहण्याचे दिलेले वचन या बळावर महापौरपद जिंकण्याचे मनसुबे शिवसेनेने आखले होते. ठाण्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी गेले दोन महिने मोर्चेबांधणी केली होती. मात्र भाजपने शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेचे अवसानच गळून पडले.

विजय चौगुले यांनी गणेशोत्सवापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिघा येथील गवते कुटुंबातील तीन नगरसेवकांना तर ते सोबत घेऊन फिरत होते. वाशीतील एका नगरसेविकेला परदेशात उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील सात असंतुष्ट नगरसेवकांपैकी चार नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यात जमा होते. दोन अपक्ष नगरसेवकांना लक्ष्मीदर्शन झाल्याने तेही शिवसेनेला साथ देणार होते. भाजपच्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवक तर चौगुले समर्थक मानले जात होते. त्यामुळे शिवसेना-भाजपाचे ४४, राष्ट्रवादीचे ४ व अपक्ष २ अशा ५० नगरसेवकांची मोट बांधल्यानंतर काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे चौगुले यांनी गेले दोन महिने ‘पेरणी’ केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद पालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला साथ दिल्यानंतरही शिवसेनेचे नेतृत्व भाजप व पंतप्रधानांवर टीका करणे बंद करत नसल्यामुळे नवी मुंबईत शिवसेनेला साथ न देण्याचा निर्णय भाजपने गुरुवारी घेतला. शिवसेनेला मित्रपक्ष पाठिंबा देत नसल्याने आम्ही साथ देण्याचा प्रश्नच शिल्लक राहात नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबरचा घरोबा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिघा येथील गवते कुटुंबातील तीन नगरसेवकांना गाठून त्यांचे मन वळविले. पाच अपक्ष नगरसेवकांना अज्ञातवासात नेण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीने ५७ नगरसेवकांच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याची तयारी केली होती. यात काँग्रेसचा पाठिंबा मिळाला तर ठीक नाही तर ५७ नगरसेवकांना ९ नोव्हेंबर रोजी थेट हजर केले जाणार होते. शिवसेनेला भाजप साथ देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर गेले अडीच वर्षे असलेले राजकीय संबंध कायम ठेवण्याचा सोयीस्कर मार्ग पत्करला. त्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर ही आता केवळ औपाचारिकता राहिली आहे.

चौगुले यांच्या वाटेत खोडा

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांना रामराम ठोकून शिवसेनेते स्थान बळकट करणारे विजय चौगुले यांच्या राजकीय कारकीर्दीला या निवडणुकीमुळे ब्रेक लागला आहे. एकेकाळी गुरु-शिष्य म्हणून ओळखले जाणारे नाईक-चौगुले यांच्या वादात अखेर नाईक यांची सरशी झाली आहे. चौगुले यांनी यापूर्वी एकदा लोकसभा, दोनदा विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. महापौर निवडणुकीत भाजपने सोडलेल्या साथीमुळे चौगुले यांना चौथ्यांदा पराभव झाला आहे.  शिवसेनेत चौगुले यांना असलेल्या अंर्तगत विरोधामुळे भाजपच्या पाठिंब्यासाठी फारसे प्रयत्न करण्यात आले नसल्याची चर्चा आहे.

काँग्रेसमधील पेच

* काँग्रेसमधील बंडखोरी पक्षाला थोपवता आली नाही, तर राष्ट्रवादी समोर पेच उभा ठाकणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंदाकिनी म्हात्रे यांना दिलेली उपमहापौरपदाची उमेदवारी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांना खटकली असून त्यांनी त्यांची पत्नी वैजयंती भगत यांचा या पदासाठी अर्ज भरला आहे, पण हा अर्ज ते मागे घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे न झाल्यास काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हात्रे यांना दगाफटका होण्याची शक्यता आहे.

* रमाकांत म्हात्रे यांनी यापूर्वी उपमहापौरपद उपभोगले असल्याने त्यांच्या पत्नीला हे पद द्यायला काँग्रेसमधून विरोध आहे. म्हात्रे हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांना हे पद देण्यात आल्याने काँग्रेस नगरसेवकांमध्ये धुसफूस आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दहा नगरसेवकांमध्ये दोन गट पडले असून सहा विरुध्द चार असा सामना सुरू आहे.

* काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी सुतार यांना पाठिंबा दिला तरी पाच अपक्षांच्या जोरावर राष्ट्रवादी ६१ नगरसेवकांचा आकडा गाठू शकणार आहे. बहुमतासाठी ५७ नगरसेवकांची आवश्यकता आहे. म्हात्रे यांना राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांचा पाठिंबा न मिळाल्यास काँग्रेसच्या उपमहापौरपदाच्या अधिकृत उमेदवाराला दगाफटका होण्याची शक्यता आहे.

* भाजपचे सहा नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 3:56 am

Web Title: navi mumbai mayor likely from ncp
Next Stories
1 फेरीवाल्यांचा गराडा कायम
2 राजीव गांधी मैदानावर क्रिकेटचे धडे
3 बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई
Just Now!
X