22 November 2017

News Flash

मेट्रोच्या दिरंगाईबाबत राजकीय पक्षांमध्ये नाराजी

सिडकोच्या संकेतस्थळावर मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन हे जुनेच आहे.

प्रतिनिधी, पनवेल | Updated: September 8, 2017 2:46 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसीचे काम सुरू करण्याची मागणी

सिडको प्रशासनाच्या संकेतस्थळावर दर्शविलेल्या मेट्रो प्रकल्पांचा क्रम परस्पर निर्णय घेऊन बदलल्यामुळे कामोठे, कळंबोली व रोडपाली येथील नागरिकांचा हिरमोड झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष व भारतीय शेतकरी कामगार पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेत सिडको प्रशासनाने रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाला गती द्यावी, अशी मागणी केली आहे. शिवाय यासाठी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावादेखील करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

जानेवारी महिन्यात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्यासोबत खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी या मेट्रो प्रकल्पाचे काम कधी सुरू करणार याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचारणा केली होती. मात्र त्या वेळी सिडकोच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाची क्रमवारी बदलून तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच पेणधर गाव ते तळोजा एमआयडीसीच्या अंतिम टप्प्याचे काम हाती घेण्यात आल्याची कल्पना लोकप्रतिनिधींना देण्यात आली नव्हती. त्यामुळे खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी या प्रकल्पाच्या पूर्वी आता अंतिम टप्प्यातील मेट्रोचे काम पूर्ण करण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्याने याबाबतची तीव्र नाराजी आता व्यक्त होत आहे. याबाबत सिडकोने लोकप्रतिनिधींनादेखील अंधारात ठेवल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. शिवाय वाढते नागरीकरण आणि कामोठे व कळंबोली येथील प्रवाशांचा थेट तळोजा एमआयडीसीसोबत असणारा व्यवहार्य संबंधांमुळे हा मेट्रो प्रकल्प लवकर मार्गी लागल्यास त्याचा फायदा नक्कीच होईल, असेदेखील त्यांनी नमूद केले.

तर दुसरीकडे शेकापनेदेखील या प्रश्नाबाबत सिडकोशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने २७ जुलै रोजी एमआयडीसी व सिडको प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत तिसऱ्या टप्प्याचे काम लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाने जाहीर केल्याची आठवणदेखील करून देण्यात आली आहे.तसेच सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन खांदेश्वर ते तळोजा येथील मेट्रो प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प  नागरिकांबरोबर सिडकोच्या पथदर्शी प्रकल्पांसाठी देखील महत्त्वाचा असल्याचे त्यांना नमूद केले आहे.

विमानतळाप्रमाणेच मेट्रोही महत्त्वाची

सिडकोच्या संकेतस्थळावर मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन हे जुनेच आहे. मात्र मागील तीन वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्यात धावणारी सिडकोची मेट्रो अद्याप रुळावरच चढू शकलेली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे सिडकोने किमान प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाला ज्याप्रमाणे महत्त्व देऊन शक्ती व संपत्ती लावली आहे, त्याच पद्धतीने सामान्यांच्या वाहतुकीशी संबंधित खांदेश्वर ते तळोजा मार्गिकेवरील मेट्रोलादेखील महत्त्व देण्याची मागणी आता राजकीय पक्षांकडून होत आहे.

First Published on September 8, 2017 2:46 am

Web Title: navi mumbai metro cidco midc