वर्षांअखेर सेवा सुरू करण्याचे नियोजन

नवी मुंबई : अनेक कारणांनी गेली दहा वर्षे रखडलेला बेलापूर ते पेंदार हे सिडकोचा मेट्रो मार्ग आता महामेट्रो पुढे चालविणार आहे. त्या संदर्भातील स्वीकारपत्र नुकतेच देण्यात आले आहे. महामेट्रोने नागपूर मेट्रो मार्ग वेळेत पूर्ण केला असून पुणे मेट्रोचे कामदेखील वेगात करीत आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. हा ११ किलोमीटरचा हा मार्ग कधी सुरू होणार हे जाहीर करण्यात आले नाही पण तो या वर्षांअखेर सुरू करण्याचे नियोजन आहे.

महामुंबईतील दक्षिण व उत्तर नवी मुंबईतील उपनगरे जोडण्यासाठी सिडकोने चार मेट्रो मार्गाचे नियोजन केले आहे. त्यातील बेलापूर रेल्वे स्थानक ते पेंदार या दक्षिण नवी मुंबईतील शेवटच्या उपनगरला जोडणाऱ्या मार्गाचे काम मे २०११ रोजी सुरू करण्यात आले होते. त्या वेळी हा ११ किलोमीटर लांबीचा मार्ग चार वर्षांत सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे हा मेट्रो मार्ग दहा वर्षे झाले तरी कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या मार्गाचे काम नागपूर व पुणे येथील मेट्रोचे काम मार्गी लावणाऱ्या राज्याच्या महामेट्रो कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय काही माहिन्यांपूर्वीच घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा प्रकल्प महामेट्रोकडे परिचालन आणि देखभाल यासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली.

या प्रकल्पासाठी यानंतर लागणारा आर्थिक स्रोत निर्माण करणे आणि तज्ज्ञांची नियुक्ती करणे ही कामे महामेट्रो करणार आहे. या प्रकल्पासाठी महामेट्रोने वीस तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती या अगोदरच केली आहे. सिडकोने या प्रकल्पाचे परिचालन व देखभाल केल्यास ८८५ कोटी खर्च येणार होता, त्याऐवजी हा खर्च आता महामेट्रो उभा करणार असून दहा वर्षांसाठी हे परिचालन महामेट्रोला दिले जाणार आहे. या मार्गामुळे उत्तर व दक्षिण नवी मुंबईला जोडणारा एक पर्यावरणस्नेही वाहतूक मार्ग उभा राहाणार असून तळोजा एमआयडीसीपर्यंत हा मार्ग जोडला जाणार असल्याने त्यापुढे तो एमआयडीसीच्या माध्यमातून कल्याण- डोंबिवलीपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव आहे.

नवी मुंबईकरांना मेट्रोची गेली अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या आड येणारे सर्व अडथळे दूर केले आहेत. महामेट्रोकडे दोन मार्गाचा अनुभव असून नागपूर मार्ग तर सुरू झाला आहे, तर पुण्याचे काम प्रगतिपथावर आहे. महामेट्रोची कामगिरी पाहता नवी मुंबई मेट्रोदेखील महामुबंईकरांच्या सेवेत लवकर रुजू होईल, असा विश्वास आहे.

– एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री, राज्य

बेलापूर ते पेंदार या मार्गासाठी लागणाऱ्या अभियांत्रिकी साहाय्य यापूर्वीच घेण्यात आले आहे. आता या प्रकल्पाचे भविष्यातील परिचालन व देखभालही महामेट्रो करणार असल्याचे स्वीकारपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता या मार्गावरील कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन सेवा सुरू होईल, असा विश्वास आहे. सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे माझे मुख्य उद्दिष्ट  आहे.

– डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको