20 April 2019

News Flash

मोरबे भरल्याने पाण्याची चिंता मिटली  

यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता.

मोरबे धरण

धरणातून ७०० दशलक्ष घनलिटर पाण्याचा विसर्ग 

नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरून वाहू लागल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाची चिंता मिटली आहे. गतवर्षी हे धरण २५ ऑगस्ट २०१७ ला भरले होते. यंदा बरोबर १ महिना आधी धरण भरले. मंगळवारी रात्री ८ पासून बुधवारी पहाटे ३ पर्यंत ७०० दशलक्षलीटर पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला. पाण्याची चिंता मिटली असली, तरीही  पाण्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी रहिवाशांना केले आहे.

पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना मोरबे धरण परिसरातील रहिवाशांना सायरन वाजवून देण्यात आली होती. त्याआधीच त्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.

यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता. त्यातच या वर्षी जास्त घनतेने पाऊस पडल्याने २५ जुलैलाच धरण भरले. या धरणातून शहरातील पाणीपुरवठय़ासाठी प्रतिदिन ४२० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असतो.

यंदा धरण पूर्ण भरल्यामुळे नागरिकांना कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याची माहिती मोरबे धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी  दिली.

मोरबे धरण गतवर्षी पूर्ण भरल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नव्हते. यंदाही ते पूर्ण भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याचे समाधान असून नागरिकांनीही पाणी बचत करून पालिकेला सहकार्य करावे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंपमा

 

८७.७९

मीटर विसर्ग केल्यानंतरची  पातळी

१८८.८८१

दशलक्ष घन मीटर धरणातील जलसाठ

First Published on July 26, 2018 1:20 am

Web Title: navi mumbai morbe dam overflow