नवी मुंबई पालिका प्रशासनाला विश्वास; स्वॅब, प्रतिजन चाचण्यांच्या संख्येत वाढ

नवी मुंबई : पालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीनंतरही नवी मुंबई शहरात दिवसेदिवस वाढणारी करोना रुग्णसंख्या सर्वाच्या चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. तरीही या उच्चतम रुग्णसंख्येनंतर दोन आठवडय़ांत करोना संख्या आटोक्यात येईल, असा आशावाद पालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईत १३ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असल्याने घरी विलगीकरण करण्यात आलेले ७९ हजार नागरीक आहेत. नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वॅब आणि प्रतिजन तपासण्या मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत.

धारावी झोपडपट्टी वसाहती इतकीच लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईतील बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. हा नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या टाळेबंदीनंतर शहरात स्थानिक पातळीवर तीनवेळा टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरीकांचा संयम सुटत असल्याचे दृश्य आहे. वाढती करोना संख्या आणि इतर काही कारणास्तव एक वषापूर्वी पदभार स्वीकारलेल्या आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची राज्य शासनाने बदली केली. त्यांच्या जागी अभिजित बांगर यांच्यावर करोना नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, मिसाळ यांच्या काळातील रुग्णसंख्येपेक्षा बांगर यांच्या काळात रुग्णसंख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बांगर यांनी शहरात बिघडलेल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन काही बदल तातडीने केले आहेत. अनेक उपाययोजना केल्या आहेत. भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पाच हजारांहून अधिक खाटा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रुग्ण साखळी तोडता यावी यासाठी स्वॅब व प्रतिजन तपासण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. सध्या सरासरी ३०० ते ३२५ करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. प्रतिबंधित भागांत अधिक कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे येत्या १५ दिवसांत रुग्णांची संख्या कमी होऊन ती आटोक्यात येईल, असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला. त्याच दृष्टीने प्रशासन काम करीत असून दोन अतिरिक्त आयुक्त यावर लक्ष ठेवून आहेत.

आरोग्य विभागाच्या ‘प्रकृती’वर भर

माजी पालिका आयुक्त मिसाळ यांच्या काळात तयार करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या चमूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अनुभव असलेले कमी डॉक्टर होते. आरोग्य विभागाची ढासळलेली ही प्रकृती सुधारण्यासाठी नवीन आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे पहिले काम केले. त्यानंतर काही दिवस काम करून आता सोनावणे यांची प्रकृती बिघडल्याने ते रजेवर गेले आहेत. त्यांचा या पालिकेतील कालावधी पुढील महिन्यात संपत आहे. त्यांच्या जागी करोनामुक्त झालेले डॉ. दयानंद कटके यांच्यावर जबाबदारी सध्या आहे.

एपीएमसीत प्रतिजन चाचण्यांना सुरुवात

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे तेथून करोनाची साखळी वाढू नये, यासाठी आता बाजार समितीतही प्रतिजन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजवर ३० संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. यातील दोघांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘एपीएमसी’त शीघ्र प्रतिजन चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. धान्य बाजारातील व्यापारी भवन येथे हे चाचणी केंद्र सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, त्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने तसेच पावसामुळे दुपारी तीन वाजता कांदा-बटाटा बाजारातील मुख्यालयात ‘ई-नाम’ योजनेच्या प्रयोगशाळेत घेण्यात आली. पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर आणि तुर्भे येथील पाच, इलठणपाडा दिघा, नोसिल नाका, घणसोली, वाशीगाव जुहूगांव आणि कुकशेत अशा पालिकेच्या सहा नागरी आरोग्य केंद्रांत प्रतिजन चाचण्या घेण्यात येत आहेत.

याशिवाय सर्व २३ नागरी आरोग्य केंद्रांत ही सुरुवात करण्यात येत आहे. या ११ केंद्रांप्रमाणेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय सेक्टर ५ नेरुळ, नानेश हॉस्पिटल सेक्टर ८ ए बेलापूर, जयराज हॉस्पिटल सेक्टर ४ बेलापूर, वे टू हेल्थ डायग्नोसिस सेंटर सेक्टर-४२ सीवूड, नेरुळ, एक्सेल लॅब सेक्टर-२१ नेरुळ अशा ५ ठिकाणी या चाचण्या घेतल्या जात आहेत.