८० टक्के खाटांचे व्यवस्थापन पालिका प्रशासनाकडे

नवी मुंबई ; मधील करोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला असतानाच पनवेल, उरण, बदलापूर, अंबरनाथ या शहरांतील करोना रुग्णही उपचारासाठी नवी मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे शहरातील पालिकानिर्मित रुग्णालयांतील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन २०१५ कायद्यानुसार सर्व खासगी  रुग्णालयातील ८० टक्के रुग्णशय्याचे व्यवस्थापन हे पालिका प्रशासनाच्या देखरेखेखाली होणार आहे. त्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे रुग्णांना दाखल करून घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर पालिकेचा अंकुश राहणार आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज सरासरी एक हजार करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण आहे. एप्रिलअखेर किंवा मे महिन्यात होणाऱ्या लग्न समारंभामुळे ही संख्या वाढण्याची भीती पालिकेच्या आरोग्य पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या रुग्णांना उपचारासाठी सामावून घेणारी यंत्रणा खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने राबविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४३६ अत्यवस्थ रुग्णासाठी        आयसीयूमधील रुग्णशय्या तयार ठेवण्यात आल्या असून ही संख्या पाचशेपर्यंत वाढवली जाणार आहे. ऑक्सिजन रुग्णशय्यांची संख्यादेखील दोन हजारांच्या घरात असून कोविड काळजी केंद्रातील रुग्णशय्या ही पाच हजार रुग्णशय्यांची आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता शय्याची संख्या वाढविण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील मोठय़ा खासगी रुग्णालयांसाठी एक नोडल अधिकारी नेमला आहे. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार प्रक्रिया राबविली जाणार आहे. नवी मुंबईत रिलायन्स, अपोलो, फोर्टिज, एमजीएमसारखी विशेष रुग्णालये असल्याने अनेक शहराबाहेरील रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत. यात या पंचतारांकित रुग्णालयांचे शुल्क भरू शकतील अशा रुग्णांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे खासगी रुग्णालय या शहराबाहेरील कोविड रुग्णांना दाखल करून घेत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अशा बडय़ा खासगी रुग्णालयांतील ४० टक्के रुग्णशय्या ह्य़ा मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली. पनवेल, उरण या आजूबाजूच्या शहरांतील रुग्णांनी व्यापून टाकलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोविड रुग्ण हे प्रतीक्षा यादीवर आहेत. या खासगी रुग्णालयांना शहराबाहेरील रुग्ण घेऊ नका, असे स्पष्ट सांगणे प्रशासनाला योग्य वाटत नाही. अशा प्रकारे सूचना करणे हे मानवीय दृष्टीने योग्यदेखील नाही असे मत आरोग्य विभागाच्या पथकाने व्यक्त केले. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेतला असून स्थानिक प्रशासन हे खासगी रुग्णालयातील ८० टक्के रुग्णशय्या ताब्यात घेऊन त्यांचे व्यवस्थापन करू शकणार आहे. त्यामुळे यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आधार कार्ड तपासले जाणार असून ८० टक्के स्थानिक व २० टक्के शहराबाहेरील रुग्ण असे समीकरण राबविले जाणार आहे. स्थानिक रुग्णांची काळजी घेणे हे स्थानिक प्रशासनाचे काम असून त्यासाठी हा कायद्याचा आधार घेतला जाणार असल्याचे मत आरोग्य विभागातील डॉक्टरांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्ह्यात रुग्णालये अपुरी!

ठाणे : जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी पाच ते सहा हजार रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्ह्य़ातील करोना रुग्णालये रुग्णांनी भरू लागली आहेत. रुग्ण उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याचे चित्र जवळपास सर्वच शहरांमध्ये दिसू लागले असून ग्रामीण भागातही जेमतेम २५ टक्के खाटा शिल्लक आहेत. ठाणे शहरात १ हजार १२, कल्याण-डोंबिवलीत ५२३, भिवंडीत ३२१, उल्हासनगरमध्ये २२६, अंबरनाथमध्ये ५५ आणि बदलापूरमध्ये १८५ खाटा शिल्लक आहेत.

अतिदक्षता रुग्णशय्यांची शहराबाहेर तजवीज

शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णशय्या संपूर्ण व्यापल्या गेल्याने पालिकेला आता शहराबाहेर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील १०० रुग्णशय्यांची तजवीज करण्याची वेळ आली आहे. एमजीएमच्या सानपाडा येथील नियोजित रुग्णालयातील दोन मजले हे केवळ एमजीएम समूहाच्या रुग्णालयातील परिचारिकांसाठी राखीव असल्याने या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांची व्यवस्था करण्यास एमजीएम व्यवस्थापनाने स्पष्ट नकार दिल्याने पालिकेला त्यांच्या कामोठे येथील रुग्णालय व महाविद्यालयातील १०० रुग्णशय्यांवर अवलंबन राहावे लागणार आहे.

असून यातील २७ रुग्णशय्या मंगळवारी पालिकेच्या ताब्यात मिळणार आहेत. याशिवाय पालिका वाशी येथील कोविड काळजी केंद्रात ७५ रुग्णशय्या अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी तयार करीत आहे.

वाढत्या करोना रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पालिका सर्व स्थरावर प्रयत्न करीत आहे. खासगी रुग्णालयांच्या सहभागाने अतिदक्षता रुग्णशय्या वाढविल्या जात असून ही संख्या सातशेपर्यंत नेली जाणार आहे. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शहराबाहेरील रुग्णांची संख्या जास्त आहे. सर्वाना उपचार मिळाले पाहिजेत मात्र स्थानिक नागरिकांना प्राधान्य हवे यासाठी ८० टक्के रुग्णशय्या या स्थानिक रहिवाशांना कशा उपलब्ध होतील याची काळजी घेतली जाणार आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका