लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर महापालिका आयुक्त मुंढे यांचा सवाल

‘माझ्या आजवरच्या प्रशासकीय कारकीर्दीत मी कधीही लोकशाही व्यवस्था अव्हेरलेली नाही. मी लोकशाही मानत नाही, असा आरोप माझ्यावर करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात सर्वसाधारण सभेत मला माझी बाजू मांडण्याची साधी संधीही नाकारण्यात आली. मला मुख्यालयात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी धमकीवजा भाषा कोणत्या लोकशाही व्यवस्थेत बसते,’ असा परखड प्रश्न नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईतील नगरसेवक व महापौरांना केला आहे. आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला असला, तरी जोपर्यंत राज्य सरकारचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत मी दररोज कार्यालयात येऊन माझे काम करत राहीन, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर पुढील काही दिवसात त्यांच्याविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा भाजपवगळता महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे. यासंबंधीचे पत्रही पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना देण्यात आले आहे. अविश्वास ठरावानंतरही मुंढे मुख्यालयात आलेच तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. यासंबंधी मुंढे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशी इशारेवजा भाषा कोणत्या लोकशाही व्यवस्थेत बसते, असा सवाल केला. ‘अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असताना मी सभागृहात उपस्थित होतो. या चर्चेदरम्यान मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे वाटले होते. मागणी करूनही मला बोलू देण्यात आले नाही,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या ठरावासंबंधी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत आयुक्त म्हणून मी नियमित कामकाज सुरू ठेवणार आहे. सरकारचे पुढील आदेश येत नाहीत तोवर मी नेहमीप्रमाणे महापालिका मुख्यालयातील कार्यालयात उपस्थित राहणार असून कामकाज करणार आहे. घटनेतील कलमानुसार राज्य सरकारने माझी या ठिकाणी आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे यासंबंधी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत आयुक्त म्हणून महापालिकेचे कामकाज पाहणे हे माझे कर्तव्य असून त्यापासून मला कुणीही परावृत्त करू शकत नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. अविश्वास ठराव मंजूर होताच तुम्ही सक्तीच्या रजेवर जाणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता मी कोणत्याही रजेसाठी अर्ज केलेला नाही आणि माझा तसा विचारही नाही, असे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर शहरातील विविध सुविधांच्या नियोजनाचा एकंदर आढावाही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मी प्रकल्पग्रस्तविरोधी नाही’

‘मी आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर काही गावांमध्ये महापालिकेच्या जमिनीवर नव्याने उभ्या राहात असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली. प्रकल्पग्रस्तांनी उभ्या केलेल्या एकाही जुन्या बांधकामावर मी कधीही कारवाई केलेली नाही. सद्य:स्थितीतही प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या बांधकामांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नसून यासंबंधी सातत्याने गैरसमज पसरविले जात आहेत. महापालिकेच्या मालकीच्या सुविधा भूखंडांवर होणारे बेकायदा बांधकाम रोखणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी बजावले. मात्र, मी प्रकल्पग्रस्त विरोधी आहे असा प्रचार करत चुकीचे समज पसरविण्याचे काम करण्यात आले. या शहराचा आयुक्त म्हणून गावांमधील सोयी सुविधांचे सक्षमीकरण करण्यास मी बांधील असून मी प्रकल्पग्रस्त विरोधी नाही,’ असे मुंढे यांनी स्पष्ट केले.