स्वेच्छा निधीतून नागरी कामे करण्यास नगरसेवकांना प्रतिबंध

नवी मुंबई : पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे, मात्र पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छा निधीतून सात फेब्रुवारीपासून कोणत्याही प्रकारची नागरी कामे सुचविता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही नगरसेवक प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी या नागरी कामाचा प्रस्ताव सादर केला आहे अशी दिशाभूल करणारी आश्वासने देत आहेत. त्याला आयुक्तांनी चाप लावला आहे.

नवी मुंबई पालिकेच्या पाचव्या सभागृहाची मुदत सात मे रोजी संपत आहे. त्यामुळे गेली पाच सत्र पालिकेच्या एप्रिल महिन्यात निवडणूका पार पडत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर मे महिन्यात महापौर निवडणूक घेतली जात असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे मविआ अस्तित्वात आली आहे. याच सरकारच्या आदेशाने अगोदर जाहीर झालेली बहसदस्यीय पध्दत रद्द होऊन आता एकसदस्यीय निवडणूक होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. आघाडीचे काही प्रयोग जिल्हा परिषद व पंचायत निवडणूकीत यशस्वी होत आहेत. तोच प्रयोग नवी मुंबईत केला जाणार असून आघाडी मध्ये बिघाडी होण्या अगोदर ही पालिका निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने मविआचे नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक लवकर व्हावी असा त्यांचा मतप्रवाह असून एप्रिल च्या पहिल्या आठवडय़ात ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पंधरा फेब्रुवारी पर्यत निवडणूकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असून तशी तयारी पालिकेने केलेली आहे.

पालिका निवडणूकीची आचारसंहिता ४५ दिवस लागणार असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या किवां तिसऱ्या आठवडय़ात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नगरसेवकांना निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच पालिकेची आचारसंहिता लागू केली आहे. पालिका सभागृहाची मुदत संपण्या अगोदर तीन महिने आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या संदर्भीय आदेशानुसार ही आचारसंहिता जाहीर केली आहे. त्यामुळे सात फेब्रुवारी पासून सात मे पर्यंत कोणताही नगरसेवक आपल्या स्वेच्छा निधी अथवा नगरसेवक निधीमधून कोणत्याही नागरी कामाचा प्रस्ताव पालिकेला सादर करू शकणार नाहीत. असा प्रस्ताव सादर केल्यास अधिकारी त्याची दखल घेणार नाहीत.

सात फेब्रुवारी पूर्वी सुरु झालेली नागरी कामे मात्र कायम राहतील पण या कामाचे आदेश दिले गेले नसल्यास ते यानंतर देऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी आपली आचारसंहिता जाहीर  केली  आहे. प्रभागात राहिलेली शिल्लक कामे अथवा मतदारांनी सुचविलेले नागरी कामे व्हावीत यासाठी नगरसेवक आधिकाऱ्यांना असे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करीत होते. त्याला आता चाप बसणार आहे.

कामातूनच ‘लक्ष्मी दर्शन’

पालिका निवडणूक जाहीर होण्याची सर्वसाधारण तारीख सर्व नगरसवेकांना माहित आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन वर्षांत या निवडणूकीचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे ‘गटर-मीटर-वॉटर’ची अनेक कामे नगरसेवकांनी केलेली आहेत. यात उद्यानातील हायमास्ट दिवे, व्यायामशाळेचे साहित्य, खेळणी, फरसबंदी (पेव्हर ब्लॉक) अशा कामांचा समावेश आहे. या कामातूनच नगरसेवकांना ‘लक्ष्मी दर्शन’ होत असल्याने त्यावर जास्त भर आहे.