दिघा येथील पालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेवर विरोधी नगरसेवकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविल्यानंतर पालिका आयुक्त आणि महापौर यांनी मिळून गुरुवारी शाळा पाहणी दौरा केला; मात्र दौऱ्यासाठी आलेले पालिका आयुक्त शिवसेना नगरसेवक जगदीश गवते यांच्या बंगल्यावर उतरले आणि मेजवानी झोडून निघूनही गेले.
आयुक्त आणि महापौर येणार असल्याने या परिसरातील राहणारे नागरिक परिसरातील समस्या सांगण्यासाठी चार तास ताटकळत उभे राहिले. या वेळी आयुक्तांनी तक्रारी ऐकण्यासाठी शिक्षणाधिकांऱ्याना पाठवून दिले. त्यामुळे गंभीर प्रश्नांवर आयुक्त का लक्ष घालीत नाहीत, असा सवाल करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला. दिघा परिसरातील पालिकेची तात्पुरती शाळा आहे. तिच्यावर पत्र्याची शेड आहे. या शाळांच्या सुविधा आणि इतर समस्यांची पाहणी करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक अनेक वर्षांपासून करीत आहेत. यावरून बुधवारी महापौर सुधाकर सोनवणे आणि पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संयुक्त पाहणी दौरा करण्याचे आश्वासन दिले; हे आश्वासन प्रत्यक्षात काही उतरले नाही. शाळा समस्यांचे गांभीर्य लक्षात न घेता आयुक्तांनी मेजवानी महत्त्वाची मानली. यासाठी स्थानिक नगरसेवकाच्या आलिशान बंगल्यात मांसाहारी जेवणावर त्यांनी ताव मारला. विशेष म्हणजे यासाठी नगरसेवकांचे काही कार्यकर्तेही कामाला लागल्याचे बोलले जात होते. मेजवानी आटोपल्यानंतर पालिका आयुक्तांनी दौऱ्यासाठी नंतर येतो, असे सांगितले. त्याच वेळी दिघ्यातील शाळांची पाहणी केली जाईल, असे पुन्हा आश्वासन दिले.
शाळेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे शिक्षणाधिकारी बाळकृष्ण पाटील आणि विभाग अधिकारी गणेश आघाव यांना पाठवून दिले. दिघ्यातील दोन शाळांमध्ये शौचालयाची सोय नाही. महिला शिक्षकांची त्यामुळे मोठी अडचण होते. याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिक्षण खात्याचे उपआयुक्त अमरीश पटनिगिरे यांना न्यायालयात जावे लागल्याने ते या दौऱ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र हा दौरा आयुक्तांचा होता असे महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट केले.