२४ तास पाणीपुरवठा करण्याचा पालिका आयुक्तांचा आदेश
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यात कपातीवर भर देण्यात आली असताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र शहराला २४ तास पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातच यंदा पाणीसाठा कमी असल्याने पालिकेने पाणीकपातीचे पाऊल उचलेले आहे; परंतु येत्या काळात पाणी कमी असले तरीही पुरवठा मात्र २४ तासच व्हावा. त्यासाठी नियोजनावर भर द्या, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
पाणीपुरवठय़ाची नैतिक जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाटील यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांना फैलावर घेतले; पण याच वेळी पाटील यांचे विभागप्रमुख शहर अभियंता मोहन डगांवकर यांना पाठीशी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दर आठवडय़ाला होणाऱ्या विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांची सर्वासमोर हजेरी घेतली जात आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी भीतीच्या सावटाखाली काम करीत आहेत. त्यात अतिरिक्त आयुक्त म्हणून गेली दहा वर्षे काम करणारे डॉ. संजय पत्तीवार यांची गच्छंती करण्यात आली आहे. तर डॉ. दीपक परोपकारी यांनाही मूळ पदावर पाठविण्यात आले आहे.
पाणीपुरवठय़ाची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांची आहे. गेले अनेक महिने पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंतचा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. त्यामुळे प्रारंभी असणाऱ्या तक्रारीनंतर पाणीटंचाई वाढल्यानंतरही कमी झाल्याचे दिसून येत आहे. सिडकोने नवी मुंबई शहरासाठी टाकलेल्या मोठय़ा जलवाहिन्या दोनशे कोटी रुपये खर्चून बदलण्यात आल्या आहेत; परंतु रहिवाशांच्या घरापर्यंत जाणाऱ्या छोटय़ा जलवाहिन्या त्याच असल्याने काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे.
नवी मुंबईतील पाणीपुरवठय़ावर आजवर एक हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे कधी ऑडिट झालेले नाही.
डगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठय़ाच्या दोनशे कोटींच्या जलवाहिन्या, पारसिक हिलवरील जलकुंभ, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवणारी ४२ कोटींची स्काडा यंत्रणा, जांभूळपाडा येथील पंपहाऊस, ४५० कोटीचे मोरबे धरण खरेदी, शेवटच्या टोकापर्यंत गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या सर्व कामांचे काय झाले त्याचप्रमाणे या कामातील अनियमितता याचा तपास केल्यानंतर शहरातील पाणीपुरवठय़ात मुरणाऱ्या पाण्याचा थांगपत्ता लागणार आहे, असे मत येथील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

अंगझडतीवरून वादंग
पालिकेच्या २५ वर्षीय इतिहासात एम. रमेश कुमार, प्रेमसिंग मिना यांच्यासारखे काही कडक शिस्तीचे अधिकारी आयुक्त म्हणून येऊन गेले आहेत. त्यानंतर बहुतांशी पदोन्नतीने आलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बोटचेपे धोरणामुळे पालिकेचा कारभार ढेपाळला आणि तो पुढाऱ्यांच्या हातात कधी गेला हे नवी मुंबईकरांना देखील कळले नाही. बऱ्याच वर्षांनंतर पालिकेचा कारभार एक सक्षम, कार्यक्षम आणि पारदर्शक अधिकारी मुंढे यांच्या हाती आल्याने नवी मुंबईकर सुखावले आहेत, पण या धडाकेबाज निर्णय साखळीत काही निर्णय घाईगडबडीत व अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून घेतले जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या कामाची झाडाझडती घेताना एका कर्मचाऱ्याची अंगझडती घेऊन त्याच्या खिशातील पैसे मोजणे ही पद्धतही अशीच अंगलट येणारी आहे.