नवी मुंबई पालिकेचा खासगी रुग्णालयांशी करार; पनवेल पालिकेकडून कोकण आयुक्तांना विनंती

नवी मुंबई/पनवेल : पालिकेच्या पातळीवर खाटा आणि मनुष्यबळ यातील ताळमेळ आणि रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई आणि पनवेल महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. यात नवी मुंबई पालिकेने अतिदक्षता, प्राणवायू पुरविणारी यंत्रणा असलेल्या खाटा आणि कृत्रिम श्वसनयंत्रणा पुरविण्यासाठी खासगी रुग्णालयांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पनवेल पालिका प्रशासनाने दोन हजार खाटांसाठी (जम्बो फॅसिलिटी) सरकारकडे ५० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

अन्य दोन खासगी रुग्णालयाशी करार करण्याचा निर्णय नवी मुंबई पालिकेने घेतला आहे. सुविधांसोबत त्यासाठी लागणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी मिळत नसल्याने पालिकेच्या पातळीवर ही तयारी करता येत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात आठ हजारांहून अधिक रुग्ण बाधित आहेत. वाढत्या करोना चाचणीच्या मोहिमांमुळे भविष्यात ही संख्या १५ हजारांवर जाणार असल्याने पालिकेने दोन हजार खाटांची सोय करण्यासाठी नियोजन केले आहे. यात मोठय़ा सुविधांसाठी (जम्बो फॅसिलिटी) अतिदक्षता विभागात ५०० खाटा असतील, तर एक हजार खाटांना प्राणवायू पुरवठा करणारी यंत्रणा असेल. उर्वरित ५०० खाटा या साधारण विभागातील असतील. या सर्व बाबींसाठी सुमारे ३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यासाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मोठी उपचार सुविधा उभारण्यासाठी निधीची मागणी केली आहे. मंजुरी मिळाल्यास तातडीने अंमलबजावणी होऊ  शकेल, असे पनवेल पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

७५ अतिदक्षता खाटांची सोय लवकरच

सध्या नवी मुंबईत अडीच हजारांहून अधिक प्राणवायू पुरविणारी यंत्रणा असलेल्या खाटा आहेत. मात्र, कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि अतिदक्षता विभागातील खाटांची मोठी कमतरता जाणवत आहे. त्यामुळे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील कोविड रुगणालयानंतर  पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्रात ७५ अतिदक्षता खाटांची सोय करण्यात येणार आहे.  नेरुळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात ८० कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि १२० अतिदक्षता विभागातील खाटा तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. येत्या १० सप्टेंबपर्यंत खासगी रुग्णालय अतिदक्षता खाटा तयार करणार आहे. पालिका आणखी १०० खाटांसाठी अन्य दोन खासगी रुग्णालयांशी करार करण्याची तयारी करीत असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

५० हजार प्रतिजन चाचण्यांचा संच

* नवी मुंबईसाठी अतिरिक्त ५० हजार प्रतिजन चाचण्या संच मिळाले आहेत. दिवसाला सरासरी २५०० प्रतिजन चाचण्या  केल्या जात आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी झाली आहे.

* शहरातील २५ केंद्रांवर प्रतिजन चाचण्या सुरू आहेत. ३४ वाहनांद्वारे विविध ठिकाणी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ४० हजार प्रतिजन चाचण्यांद्वारे नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता ५० हजार चाचण्यांचा संच मिळाला आहे. दूरध्वनीद्वारे प्रतिजन चाचण्यांची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

* शहरात आरटीपीसीआर चाचण्यांपेक्षा दिवसागणिक प्रतिजन चाचण्यांची संख्या जास्त होत आहे. नागरिकांनी कोणताही ताप, खोकला अंगावर काढू नये. तात्काळ चाचणी करण्याचे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

खाटांची स्थिती आता संकेतस्थळावर

पनवेल : शहर महापालिका प्रशासनाने करोनाग्रस्तांसाठी विविध रुग्णालयांमधील शिल्लक खाटांची स्थिती जाणून घेण्यासाठी Covidbedpanvel.in हे संकेतस्थळ मंगळवारपासून सुरू केले आहे. यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णालय गाठता येणार आहे. यापूर्वी अनेक रुग्णालयांचा संपर्क क्रमांकावर प्रतिसाद मिळत नसल्याचे आणि शिल्लक असूनही रुग्णालयाकडून खाटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या.