|| शेखर हंप्रस

महापालिकेचा ‘दक्ष प्रणाली’चा दावा; एक हजार ‘खाचखळग्यां’ची दुरुस्ती

शहरातील अंतर्गत रस्त्यावर पावसात एकही खड्डा पडला नाही, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पालिकेच्या ‘दक्ष’ प्रणालीवर आतापर्यंत फक्त खाचखळग्यांचीच नोंद झाली असून एक हजार ४३ खाचखळगे बुजविण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेली काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे दुचाकीचालकांसह ‘एनएमएमटी’ व ‘बेस्ट’चे चालकही वैतागलेले दिसत आहेत. एमएआयडीसी परिसर तर खड्डय़ात गेल्याचे चित्र आहे.

या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली असता, शहरात अंतर्गत रस्त्यांवर एकही खड्डा पडला नसल्याचे सांगितले. तांत्रिकदृष्टय़ा खड्डा (पॉट होल) हे रस्त्याच्या पातळीपासून किमान दहा ते बारा इंच खोल असेल तरच त्याला खड्डा म्हटले जाते. सध्या जे रस्त्यावर दिसत आहेत ते खाचखळगे आहेत. ते बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. असे किती खाचखळगे आहेत, अशी विचारणा केली असता, मात्र त्याची पालिकेकडे नोंद नाही. मात्र आतापर्यंत एक हजार ४३ खाचखळगे बुजविण्यात आले असून बेलापूर व नेरुळ परिसरात ते सर्वाधिक होते असे सांगण्यात आले.

१ जूनपासून नवी मुंबई महापालिकेने देखभाल दुरुस्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘दक्ष अ‍ॅप’ ही अत्याधुनिक संगणक प्रणाली सुरू केली आहे. यात कंत्राटदारांच्या कामावर लक्ष ठेवले जाणार असून हलगर्जीपणा आढळल्यास त्याच्या कामाच्या बिलातून ती रक्कम कमी करून घेतली जाणार आहे. यामुळे पाणीपुरवठा, मलनिस्सारण तसेच रस्त्यांची देखभालीवर चालढकलपणा होणार नाही. तसेच या वर्षी शहरात एकही खड्डा पडणार नाही असा दावा पालिकेने यापूर्वीच केला होता. त्यानुसार हे काम एका ‘आऊट सोर्सिग’ संस्थेमार्फत केले जात आहे. या संस्थेचे प्रतिनिधी रस्त्यावर पडलेल्या खचखळग्यांचे फोटो काढून या प्रणालीवर टाकत आहेत. त्यानुसार पालिका मुख्यालयात ही प्रणाली हाताळत असलेली अधिकारी तो खड्डा आहे की खाचखळगा हे ठरवतात. त्यानुसार आतापर्यंत पालिकेच्या व्याख्येप्रमाणे एकही खड्डा पडल्याची नोंद नाही. जे काही खाचखळगे आहेत, ते तत्काळ बुजविण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले जातात. त्यानुसार आतापर्यंत एक हजार ४३ खाचखळगे बुजविण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसाने डांबरी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम पावसाचा अंदाज घेत केली जात आहेत.      – सुरेंद्र पाटील, शहर अभियंता

बुजवलेले खाचखळगे

  • ऐरोली : ३६
  • बेलापूर : ३८०
  • कोपरखैरणे : २०९
  • नेरुळ : ३२१
  • तुर्भे : १९
  • वाशी : ७८