|| विकास महाडिक

भविष्यातील पाणी नियोजनही आत्ताच; जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

रायगड जिल्ह्य़ातील पाताळगंगा नदीचे पाणी मोरबे धरणात आणून सोडणे, पर्यावरण प्रयोगशाळा उभारणे आणि नेरुळ येथे विज्ञान केंद्र सुरू करणे या तीन प्रमुख नवीन प्रकल्पांबरोबरच दीड हजार कोटी रुपये खर्चाच्या नागरी कामांना नवी मुंबई पालिका यंदा गती देणार आहे. सिडकोने निर्माण केलेल्या या नियोजनबध्द शहरात आता नवीन प्रकल्प उभारण्यापेक्षा आहे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. गेल्या वर्षी केवळ अर्थसंकल्प सादर करण्याची औपचारिकता पूर्ण करणारे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी जुन्याच कामांना गती देण्याचा संकल्प सोडला आहे.

मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण असलेली नवी मुंबई पालिका हे राज्यातील दुसरी पालिका आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अर्धवट सोडलेले खालापूर तालुक्यातील मोरबे धरण पालिकेने विकत घेतले आणि पालिका पाण्यात स्वयंपूर्ण झाली. त्यामुळेच देशात राहण्याजोगे दुसऱ्या पसंतीचे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक झालेला आहे. संपूर्ण शहराला चोवीस तास पाणी पुरवठा केला जात असल्याने या शहरात वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची आबाळ होऊ नये यासाठी आत्तापासून पालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ही एक जमेची बाजू आहे. त्यासाठी ४५० दशलक्ष लीटर पाण्याची क्षमता असलेल्या मोरबे धरणापर्यंत पाताळगंगा नदीचे पाणी आणून सोडण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाण्यावर पालिकेने दावा केला आहे. शेजारच्या पनवेल पालिकेत पाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झालेला असताना नवी मुंबई पालिकेने वाढत्या लोकसंख्येसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था आत्तापासून सुरू केली आहे. पिण्याच्या पाण्यावरच पालिकेचे ऐश्र्वय ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येते. माजी पालिका आयुक्त सुनील सोनी यांनी क्षणाची उसंत न लावता बंद पडलेले मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या धरणाची क्षमता वाढविण्याचा डॉ. रामास्वामी यांनी घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. पाताळगंगा नदी हा बाराही माहिने ओसंडून वाहणारी नदी आहे. पालिकेने या नदीपासून पाणी उचलण्यास सुरुवात केल्यास भविष्यात नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे या निर्णयाचे नवी मुंबईकर मनापासून कौतुक करीत आहेत.

नवी मुंबईतील पर्यावरणाचा प्रश्न काहीसा बिकट होऊ लागला आहे. डोंगर आणि खाडी यांच्या मधील बेटावर तयार करण्यात आलेल्या नवी मुंबईला इतर शहरापेक्षा जास्त प्रदुषणाचा त्रास आहे. मुंबईतील क्षेपणभूमींचा प्रदुषणही नवी मुंबईच्या वाटय़ाला येत आहे. दगडखाणींचा खडखडाट सध्या बंद असला तरी नवी मुंबई विमानतळाच्या कामांचा दणदणाट सुरू आहे. शहरातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि चार हजार छोटय़ा मोठय़ा कारखान्यातील काही कारखानदारांनी केलेली पर्यावरणाशी प्रतारणा यामुळे नवी मुंबईत २९ टक्के प्रदुषण जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी पालिकेने अद्यावत प्रयोगशाळा उभारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राज्य प्रदुषण केंद्राचा नार्केतपणा उघडय़ावर पडणार आहे.

शहराला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न डॉ. रामास्वामी करीत आहेत. त्यासाठी नेरुळ येथील वंडर पार्क मधील मोकळ्या भूखंडावर जादा एफएसआय घेऊन एक आधुनिक विज्ञान केंद्र उभारण्यावर भर दिली जात आहे. हे केंद्र नवी मुंबईची ओळख ठरणार आहे. पुणे, बंगळुरु या शहरात असलेल्या विज्ञान केंद्रापेक्षा सरस हे विज्ञान केंद्र होणार आहे. सिडकोच्या वाढीव एफएसआयची वाट न पाहता या कामाला यंदा सुरुवात होणार आहे. सिडको देईल त्या भूखंडावर पालिकेला आपले प्रकल्प उभारावे लागत आहे. त्यामुळे सिडकोच्या दानपात्रावर पालिकेचे भवितव्य अवंलूबून आहे.

हे तीन प्रकल्पाबरोबर सर्व रस्त्याचे वार्षिक देखभाल पहिल्याच वर्षी देण्यात येणार आहे. शहराचे विदुप्रीकरण करणाऱ्या फलकबाजीची कायमची सुट्टी करुन ठरलेल्या जागी ही जाहिरातबाजी करण्याची मुभा दिली जाणार असून पीपीपी तत्वावर हा प्रकल्प दिला जाणार असून पालिकेला यातून सात कोटी रुपये मिळणार आहेत.

ठाणे बेलापूर, तुर्भे, घणसोली, ऐरोली येथे वाहतुक कोंडी फोडणारे चार उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. विशेष म्हणजे गेली २८ वर्षे न झालेले काम यावर्षी होणार आहे. शहरात प्रवेश करणारे सहा रस्ते आहेत. या मार्गावर पालिकेने अद्याप स्वागत फलक लावलेले नाहीत. यंदा चार कोटी रुपये खर्च करुन पालिका क्षेत्रात प्रवेश केल्याची नांदी देणारे फलक लागणार आहेत. कोपरखैरणे व ऐरोली येथील मलनिसारण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी एमआयडीसीतील कारखान्यांना विकले जाणार आहे. एमआयडीसीला सांडपाणी विकणारी नवी मुंबई पालिका ही पहिलीच पालिका ठरणार आहे.

आरोग्यासाठी १६१ तर शिक्षणासाठी १०४ कोटींची तरतूद

शांत, संयमी आणि दृढनिश्चियी पालिका आयुक्तांचे आरोग्य आणि शिक्षण हे दोन आवडते विषय आहेत. त्यामुळे कर्मचारी व डॉक्टर अभावी सुरू न झालेले ऐरोली व नेरुळ येथील १०० खाटांच्या रुग्णालये सुरू होणार आहेत. वाशी येथील मध्यवर्ती ३०० खाटांचे रुग्णालय कात टाकणार आहे. याशिवा गावातील प्रथम संर्दभ रुग्णालये या सेवांवर १६१ कोटी खर्च केले जाणार आहेत. सीबीएसई सारख्या शाळा सुरु करणारी नवी मुंबई पालिका पहिलीच आहे. त्यामुळे शिक्षणावर १०४ कोटींची तरतूद आहे.

चांगल्या सेवा सुविद्या मिळणार

दीड हजार कोटी रुपयांची आरंभीची शिल्लक हातात ठेवून सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प म्हणजे पालिकेची प्रगती आहे. पालिकांनी निधी शिल्लक ठेवू नये असा एक संकेत आहे. पालिकांकडे निधी असल्यास राज्य किवां केंद्र सरकार हात आखडता घेते. त्यामुळे गेल्या वर्षी दोन हजार कोटी शिल्लक ठेवणाऱ्या पालिकेने यंदा केवळ ९१ लाख रुपये खर्च करुन तीन हजार ४५५ कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना अधिक चांगल्या सेवा सुविद्या मिळणार आहेत.