नेरुळमधील शाळा खासगी संस्था; तर कोपरखैरणेतील शाळा पालिका चालवणार

राज्यभरातील शाळा सुरू होऊन महिना उलटत आल्यानंतर आता नवी मुंबई महापालिकेने आपल्या पहिल्यावहिल्या  सीबीएसई शाळेची प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नेरुळ व कौपरखैरणे येथील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सोमवारपासून या शाळांचे प्रवेशअर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पालिकेच्या पहिल्या सीबीएसई शाळेची घंटा वाजणे निश्चित झाले आहे.

सीवूड्स व कौपरखैरणे येथे सीबीएसईच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे स्थायी समितीच्या मंजुरीअभावी या शाळांचा श्रीगणेशा रखडला होता. सीबीएसईच्या शाळा जुलै महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने यापूर्वीच दिली होती. आता प्रस्ताव मंजुरीनंतर नि:शुल्क अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहेत. कोपरखैरणे येथील शाळा महापालिका तर सीवूड्स येथील शाळा खासगी संस्थेमार्फत चालवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नवी मुंबई पालिकेच्या शाळांधील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढत आहे. सीवूड्स, कोपरखैरणेत सीबीएसईच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. पालिकेच्या संथ कारभारामुळे या शाळा कागदावरच राहिल्या होत्या. या शाळा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी उपोषण व अन्नत्याग आंदोलने झाली होती. सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरू करण्यासाठी खासगी शिक्षण संस्थांकडून प्रस्तावही मागवण्यात आले होते. आकांक्षा फाऊंडेशनचा प्रस्ताव पात्र ठरल्याने विद्यर्थी संख्येनुसार नियुक्त करण्यात येणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या ४५ टक्के खर्च संबंधित संस्था व ५५ टक्के खर्च पालिका करणार आहे.

प्रवेश प्रक्रिया

सीवूड्स व कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळांत पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्यांना ९ ते १६ जुलैदरम्यान सकाळी १० ते ३ या वेळेत  संबंधित शाळेत नि:शुल्क प्रवेश अर्ज मिळणार आहेत. अर्ज १७ जुलैपर्यंत जमा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

नेरुळ व कोपरखैरणे येथील शाळांच्या इमारतींत सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी केली आहे. स्थायी समितीच्या मंजुरी आवश्यकता होती. आचारसंहितेमुळे मंजुरीस विलंब झाला. दोन्ही शाळांमध्ये प्रत्येकी ३ तुकडय़ा सुरू करण्यात येणार आहेत.   – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंमपा.