प्रस्तावाला महासभेत मंजुरी; दोन परिमंडळामध्ये प्रत्येकी एक शाळा

नवी मुंबई महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करावी, या मागणीला अखेर मान्यता मिळाली असून मंगळवारी झालेल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन. यांनी महापालिकेमार्फत सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महासभेत या संदर्भातील एक प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील दोन परिमंडळामध्ये प्रत्येकी एक सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. शहरातील पालकांकडून महापालिकेमार्फत सीबीएसई शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत होती. याची दखल महासभेनेदेखील घेत या विषयावर सभागृहात चर्चा घडवून आणली होती. या चर्चेत नगरसेवकांनीही पालिकेने सीबीएसई शाळा सुरू करावी, अशी सूचना केली होती. मंगळवारी पार पडलेल्या महासभेत यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात आला होता. या विषयावर चर्चा करताना नगरसेवक रामचंद्र घरत यांनी शहरातील प्रत्येक खासगी शाळेवर एक नगरसेवक प्रतिनिधी नेमणे आवश्यक असल्याची सूचना केली. तसेच पालिकेच्या पायाभूत सुविधांच्या अभावावर देखील सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी नगरसेवक सूरज पाटील यांनी ठोक मानधनावर शिक्षकांच्या वेतनाची बोंब असताना इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळांना शिक्षक देण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे का? याबाबत विचारणा केली. त्यामुळे केवळ पाठ थोपटून घेण्यासाठी हा प्रस्ताव आणू नका, असा टोला त्यांनी लगावला.

गौतमनगर येथील शाळेसाठी ६ कोटींचा प्रस्ताव मंजूर

नवी मुंबई : ऐरोलीमधील गौतमनगर भागात असलेल्या नवी मंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७८ च्या जुन्या बैठय़ा इमारतीत विद्यार्थ्यांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शाळेची नवीन इमारत बांधण्याचा ६ कोटी रुपयांचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मंगळवारी सर्वसाधारण सभेत पटलावर ठेवला होता. गौतमनगर येथील पालिकेची प्राथमिक शाळा आहे. शाळेत १२ खोल्या आहेत. तिथे बालवाडी ते आठवीपर्यंत दोन सत्रांमध्ये शाळा भरते. पटसंख्या १ हजार ७६३ आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी ६ कोटी १७ लाख ६७ हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मंगळवारी महासभेत मांडला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

राज्य सरकार पगारावर देत असलेले अनुदान नाकारायला नवी मुंबई पालिका तयार आहे. परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शहरातील कष्टकरी शहराबाहेर जाऊ नये, म्हणून त्यांच्या मुलांना सीबीएसई शिक्षण देण्यासाठी हा प्रयत्न आहे.

सुधाकर सोनवणे, महापौर