नवी मुंबई महापौर बंगल्यासमोरील बागेची जागा; जागेवर खासगी नव्हे, सार्वजनिक बागच बांधावी लागणार

नवी मुंबई महापौर बंगल्यासमोरील सिडकोच्या मालकीचे आठ हजार चौरस मीटरचे भूखंड अतिक्रमण करून बळकावतानाच त्यावर बाग बांधून ती महापौर बंगल्याची खासगी जागा असल्याचे भासवणाऱ्या पालिकेने अखेर नमते घेतले आहे. पालिकेने सिडकोला या जागेसाठी साडेनऊ कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. शिवाय या जागेवर खासगी नव्हे, तर सार्वजनिक बाग बांधण्यात येण्याचेही पालिकेतर्फे सोमवारी उच्च न्यायालयाला सांगण्यात आले.

अतिक्रमणांना आळा घालण्याऐवजी स्वत:च अतिक्रमण करून जागा बळकावल्याप्रकरणी चपराक लगावताना ही बाग सार्वजनिक करा किंवा खासगीच ठेवा अथवा त्याचे काहीही करा, परंतु भूखंडाचे पैसे सिडकोला द्या अन्यथा तो परत करा, असे आदेश नोव्हेंबर २०१६मध्ये न्यायालयाने पालिकेला दिले होते. त्यानंतरही हे भूखंड बागेसाठी असलेल्या दराने की निवासी दराने पालिकेला द्यायचे यावरून दोन्ही यंत्रणांमध्ये वाद सुरू झाला होता. अखेर हा वाद मिटला असून या जागेचे साडेनऊ कोटी रूपये सिडकोला देणार असल्याचे पालिकेच्या वतीने सोमवारी न्यायालयाला सांगण्यात आले. शिवाय या जागेवर सार्वजनिक बाग बांधली जाईल, असेही सांगण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी पालिकेचे म्हणणे नोंदवून घेतले.

दरम्यान, सीबीडी बेलापूर येथे पारसिक हिलवर महापौरांचा बंगला आहे. त्याच्यासमोर सिडकोचे आठ हजार चौरस मीटरचे सहा निवासी भूखंड आहेत. मात्र हे भूखंड बळकावण्यात आले असून तेथे पालिकेच्याच पैशांनी सार्वजनिक बाग बांधण्यात आली. शिवाय या उद्यानाच्या भोवताली संरक्षण भिंत बांधण्यात आल्याने हे उद्यान महापौरांची खासगी बाग असल्याचे भासवण्यात येत होती. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून ही बाब उघड झाल्यानंतर प्रवीणकुमार उपाध्याय आणि संदीप ठाकूर यांनी याबाबत याचिका केली होती. शिवाय हे भूखंड आपले असून ते विकायचे होते. तसेच सव्‍‌र्हेक्षणात पालिकेने हे भूखंड बळकावण्यासोबतच महापौर बंगल्याच्या उत्तरेला बेकायदा बांधकाम केल्याचा दावाही सिडकोने प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता.