आचारसंहितेच्या कचाटय़ात रखडू न देण्यासाठी पालिका प्रशासनाची लगबग

संतोष जाधव, नवी मुंबई</strong>

नवी मुंबई महापालिकेने शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले असून ते उद्घाटनांच्या प्रतिक्षेत आहेत.  एक दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने पालिका प्रशासनाने हे प्रकल्प उद्घाटनाविना सुरू करण्याचे ठरविले आहे. पालिका आयुक्तांनी अशा सर्व प्रकल्पांची माहिती मागविली असून लवकरच ते खुले करण्यात येतील असे सांगितले.

प्रकल्पांचा राजकीय फायदा घेण्यासाठी थाटामाटात उद्घाटने केली जातात, मात्र यासाठी वाट पाहात बसावे लागते. शहरात उद्घाटनाविना पडून असलेले असे अनेक आहेत. यात घणसोलीतील सेन्ट्रल पार्क, ग्रंथालय बहुउद्देशीय इमारत, उद्याने, सानपाडा येथील संवेदना पार्क, अण्णा भाऊ  साठे बहुउद्देशीय इमारत, वाशी अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासी संकुल, ऐरोली सेक्टर १७ येथील अभ्यासिका असे अनेक प्रकल्प तयार आहेत. मात्र, उद्घाटन न झाल्याने वापराविना पडून आहेत.

सेन्ट्रल पार्क तर सुरू होण्याअगोदरच देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या व कोटय़वधी खर्चाचे तयार प्रकल्पांची यादी तात्काळ सादर करण्याची सूचना पालिका आयुक्तांनी दिल्याचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले.

यातील काही प्रकल्प लोकसभा निवडणुकीआधीपासून तयार आहेत. परंतु ते अद्याप वापरात आले नाहीत. सेन्ट्रल पार्कचे शुल्क निश्चितीही करण्यात आली आहे. ऐरोली येथील अभ्यासिकेची इमारतही पडून आहे. सानपाडा येथील अण्णा भाऊ  साठे समाज मंदिर गेल्या तीन वर्षांपासून वापरात नाही. सानपाडा येथील संवेदना उद्यानाचे दुरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. तुर्भे येथील पहिला घडय़ाळ टॉवरचीही दुरवस्था सुरू आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही शहरातील असे उद्घाटनाविना वापरात नसलेले प्रकल्प तात्काळ सुरू केले होते.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प धूळखात

* घणसोली सेन्ट्रल पार्क, तुर्भे येथील घडय़ाळ टॉवर, सानपाडा येथील संवेदना उद्यान, ऐरोली येथील अभ्यासिका, अण्णा भाऊ  साठे समाजमंदिर असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ उद्घाटन न झाल्याने पडून आहेत.

नवी मुंबई शहरात कोटय़वधींचे प्रकल्प तयार करायचे परंतु ज्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी असतात त्यांनाच त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे असे प्रकल्प तत्काळ वापरात आणण्यात येणार आहेत. प्रकल्पांची यादी मागविली असून तयार प्रकल्प सुरू करण्यात येतील.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त