लवकरच संगणकप्रणाली; अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून समस्यांची सोडवणूक करता येणार

विकास महाडिक, नवी मुंबई</strong>

शहरातील समस्या, सेवा आणि सुविधांची माहिती संगणकाच्या एका क्लिकवर मिळावी यासाठी नवी मुंबई पालिका एक वेगळी संगणक प्रणाली व अ‍ॅप विकसित करीत आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना शहरभर फिरण्याची गरज न पडता कार्यालयात बसून समस्यांची सोडवणूक करता येणार आहे. अशा प्रकारचा पारदर्शक कारभार करणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरणार आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, मलनि:सारण वाहिन्या आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे वार्षिक देखभाल कंत्राट दिले जाते. अत्यावश्यक असलेल्या या सुविधांसाठी ऐनवेळी कंत्राटदार शोधत बसण्यापेक्षा वार्षिक देखभाल करण्याची जबाबदारी टाकलेल्या कंत्राटदाराने या सेवेतील त्रुटी शोधून उपाययोजना करणे अभिप्रेत आहे. हीच पद्धत पालिका यानंतर रस्ते, उद्याने, शाळा, रुग्णालये, यांसारख्या सुविधांसाठी अमलात आणणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरी कामासाठी अंदाजपत्रक तयार करणे, त्यासाठी सर्व समित्यांची मंजुरी घेणे, सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या नाकदुऱ्या काढणे यांसारख्या सोपस्करांना सामोरे जाण्याची वेळ पालिका प्रशासनावर येणार नाही. वार्षिक देखभाल, दुरुस्ती कराव्या लागणाऱ्या सर्व कामांचा यात समावेश करण्यात येणार आहे. पहिल्याच पावसात वाहून जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ न होण्यामागे त्यांच्या कंत्राटबाजीत लागणारा वेळ हे कारण आहे. त्यामुळे शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी ही वार्षिक देखभाल कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराची राहणार असून तो जेवढे काम करेल तेवढे देयक त्याला अदा केले जाणार आहे. शहरातील या लहानसहान कामांचा लेखाजोखा पालिकेतील अधिकारी ठेवत असतात, पण ही सर्व इत्थंभूत माहिती पालिका आयुक्तांच्या दालनात संगणकाच्या एका क्लिकसरशी उपलब्ध व्हावी यासाठी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी संबंधित एजन्सीबरोबर चर्चा सुरू असून त्यांनी नुकतेच एक सादरीकरण दिलेले आहे.

पालिका येत्या काळात शहरातील मोक्याच्या ठिकाणापासून ते गल्लीबोळात एक हजार दोनशे सीसी टिव्ही कॅमेरे लावणार आहे. या अगोदर २६८ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यातील काही बंद पडलेले आहेत. नव्याने लावण्यात येणाऱ्या सीसी टीव्ही कॅमेरांच्या वेळी या बंद पडलेल्या सीसी टिव्ही कॅमेरांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे शहरात दीड हजारापेक्षा जास्त सीसी टीव्ही कॅमेरे लागणार आहेत. प्रत्येक सेवा-सुविधेची सद्य:स्थिती माहीत करून घेण्यासाठी हे सीसी टीव्ही कॅमेरे कामी येणार आहेत.

सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करण्यात येणाऱ्या पाण्यात किती घाण शिल्लक आहे तेही या नवीन संगणक प्रणालीमुळे आयुक्तांना त्यांच्या दालनात समजणार आहे.

पालिका रुग्णालयात औषधांचा साठा सद्य:स्थितीत किती आहे आणि किती औषधे वापरली गेली याचाही लेखाजोखा आयुक्त कार्यालयात बसून पाहू शकणार आहेत. प्रत्येक कामांची प्रतक्ष पाहणी केल्याशिवाय समाधानी न होणारे आयुक्तांनी शहरातील सर्व सेवा-सुविधांच्या नाडय़ा आपल्या हाती घेतल्या आहेत. त्यामुळे छोटय़ा मोठय़ा नागरी कामांच्या ठिकाणी न जाता त्या ठिकाणी त्या कामाची सद्य:स्थिती कळणार आहे.

पालिकेने जास्तीत जास्त संगणकीकरणाचा वापर करण्याचे ठरविले असून त्यासाठी २९ कोटी ९० लाखांची तरतूद केली आहे. नागरिकांना पालिकेची कामे घरबसल्या करता यावीत यासाठी सर्व विभागांचे संगणकीकरण केले जात आहे.

नगरसेवकांचे कसे होणार?

प्रत्येक नागरी कामाचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती कंत्राट काढले गेले तर शहरातील नगरसेवकांचे कसे होणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागातील छोटीमोठी नागरी कामे काढूनच नगरसेवकांचा निवडणूक खर्च निघत असतो. आयुक्तांच्या या वार्षिक देखभाल प्रस्तावामुळे नगरसेवकांची तर पुरती पंचाईत होणार आहे. शहरातील मोठय़ा प्रकल्पासाठी केवळ नगरसेवकांची मंजुरी लागणार आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या प्रस्तावाला सर्वच नगरसेवकांचा विरोध असणार हे दिसून येत आहे.

शहरातील ९८ टक्के नागरिक हे सुशिक्षित आहेत. त्यामुळे संगणकाचा जास्तीत जास्त वापरल केला जात आहे. नवी मुंबई पालिकेच्या सर्व सेवा व सुविधा संगणकाद्वारे उपलब्ध करण्याचे धोरण आखले गेले आहे. संगणकीकरण ही आजच्या युगाची गरज आहे. अत्यावश्यक सेवाबरोबरच सर्व आवश्यक सेवांची वार्षिक देखभाल दुरुस्ती केली जाणार असून शहरातील सर्व सेवांची महिती संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध केली होणार आहे.

– डॉ. रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई पालिका