आरोग्यसेवेबाबत ऐरोलीकरांची तीव्र नाराजी; वाहतूक कोंडीने त्रस्त

ऐरोलीप्रभाग ६, ७, ८, १०, ११, १२ आणि १३

आरक्षणामुळे विद्यमानांना फटका या सर्व प्रभागांत शिवसेना आणि भाजपचे प्राबल्य  आहे. येथील बहुतांश प्रभाग ठरावीक लोकांचेच मानले जातात. यात विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर, अनंत सुतार आणि राम आशीष यादव यांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी कोणताही उमेदवार दिला तरी तो निवडून येतोच असा इतिहास आहे. असे असले तर या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षणात अनेक ठिकाणी महिलांचे आरक्षण पडले आहे. प्रभाग सातचे नगरसेवक विजय चौगुले याचा प्रभाग मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाला आहे. ते प्रभाग २ मधून नशीब अजमावतील अशी चर्चा आहे. प्रभाग ८ मध्ये शिवसेनेचे बहादूर बिस्त यांचा प्रभाग मागासवर्ग महिला आरक्षित झाला आहे. प्रभाग ८ मध्ये शिवसेनेचे राजू कांबळे नगरसेवक असून हा प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. प्रभाग १२ मध्ये शिवसेनेचे संजू वाडे नगरसेवक असून मागासवर्ग महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग १३ मध्ये नंदा काटे या शिवसेनेच्या नगरसेविका असून हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

पूर्वीपासूनच ऐरोलीमध्ये राहत आहे, मात्र वाहन पार्किंग ही मोठी समस्या झाली आहे. ठरावीक विभागासाठी पार्किंग झोन बनवणे आवश्यक आहे. यावर उपाययोजना न केल्यास यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत.

-पूजा चव्हाण

पाणी व आरोग्य सेवा ही गंभीर समस्या आहे. उपचारासाठी वाशी पालिका रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी जाण्यासाठी दोनशे ते तीनशे वाहतूक खर्चासाठीच जातात. गरीब रुग्णांना ते परवडत नाही. ऐरोलीत रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत बांधली आहे, पण तेथे आरोग्य सेवा मिळत नाहीत. मग इमारतीकडे पाहून आजार बरे होणार का?

-पंकज यादव

ऐरोलीत पार्किंग ही मोठी समस्या आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते. रिक्षांना सोयीस्कर थांबे देऊन त्यांना त्या ठिकाणी थांबणेच बंधनकारक करणे गरजेचे आहे.

-संतोष गायकर

प्रभाग ६

प्रभाग ६ मध्ये यादवनगर झोपडपट्टी व खदानचा भाग येतो.  एमआयडीसी संलग्न हा परिसर असून मोठी बेकायदा झोपडपट्टी या ठिकाणी उभी राहिली आहे. एकच शाळा असून तिचीही दुरवस्था झालेली आहे. या शाळेला भेट दिल्यानंतर नवी मुंबई पालिकेचे ‘शाळा व्हीजन’ या शाळेपर्यंत अद्याप पोहोचले नसल्याचे दिसते. या परिसरातील रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था आहे. दिघा ते महापे हा एमआयडीसीअंतर्गत मुख्य रस्ता केवळ सुस्थितीत आहे. या झोपडपट्टीत पाणी समस्याही गंभीर आहे. चार वर्षांपूर्वी पालिका व एमआयडीसीने येथील बेकायदा झोपडय़ांवर मोठी कारवाई केली. मात्र पुन्हा आहे तीच परिस्थिती आहे. शौचालयांची कामे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहेत. मात्र मलनि:सारण वाहिनीचे काम मात्र झालेले नाही.

प्रभाग ७

प्रभाग ७ हा चिंचपाडा येथील गणेशनगरचा भाग येतो. हा भागही झोपडपट्टीबहुल आहे. असे असले तरी चांगली स्वच्छता या ठिकाणी दिसते. मलनि:सारण वाहिन्यांचे अनेक वर्षे रखडलेले काम पूर्ण झाले आहे. याशिवाय उल्लेखनीय म्हणावे असे काम म्हणजे ‘बायो गॅस प्लान्ट’. या भागातील अनेक घरांत वैयक्तिक शौचालयाची कामेही झालेले आहेत. पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्याने पाणी समस्या सोडविण्यात यश आले आहे. झोपडपट्टीचा भाग असल्याने वाहतूक कोंडी आणि पार्किंग या दोन मोठय़ा समस्या आहेत.

प्रभाग ८

प्रभाग ८ मध्ये चिंचपाडा आणि गवतेवाडीचा काही भाग येतो. हा प्रभागही पूर्ण झोपडपट्टीचा आहे. महत्त्वाचे म्हणजे शौचालयांची कामे झाली आहेत. मलनि:सारण वाहिनींची कामे प्रलंबित आहेत. पदपथाची कामे सध्या सुरू आहेत. या प्रभागात मोठी समस्या आहे ती शाळेची. याशिवाय उद्यान, मैदान व आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

प्रभाग १०

प्रभाग १० मध्ये ऐरोली सेक्टर १ आणि १ ए चा काही भाग येतो. या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकवस्ती असून ऐरोली नाका, समता नगर, बुद्ध विहार, शिव कॉलनी ही महत्त्वाची ठिकाणे येतात. या प्रभागात रस्ते पदपथ, पथदिवे ही कामे झाली आहेत, मात्र, पालिकेकडून कोणता मोठा प्रकल्प या ठिकाणी झाला नसल्याची खंत मात्र येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. सामासिक जागेवरील अतिक्रमण व अन्य अतिक्रमणे ही एक मोठी समस्या असून ऐरोली नाक्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न या प्रभागाचा आहे.

प्रभाग ११

प्रभाग ११ मध्ये ऐरोली गाव व सेक्टर १०चा काही भाग आणि साईनाथ वाडी हा भाग येतो. मलनि:सारण वाहिन्यांचे कामे मोठय़ा प्रमाणात शिल्लक आहेत. याशिवाय वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम प्रलंबित आहे. गावठाणातील रस्ते अत्यंत अरुंद असून त्यातच चारचाकी

गाडय़ांची संख्या मोठय़ा प्रमणात असल्याने वाहतूक कोंडी ही समस्या आहे. वीजवाहन्या या जीर्ण झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. गावात एकही उद्यान नाही. एक मैदान आहे, त्याचा उपयोग खेळांपेक्षा वाहनतळ म्हणून केला जातो. गावठाण भाग असल्याने विकासाला जास्त वाव नसला तरी बेकायदा बांधकामे ही येथील मोठी समस्या होत आहे.

प्रभाग १२

प्रभाग १२ मध्ये सेक्टर २ आणि सेक्टर १चा काही भाग येतो. या प्रभागात उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या मोठय़ा प्रमणात भूमिगत करण्यात यश आलेले असले तरी जवळपास ४० टक्के काम बाकी आहे. या प्रभागात एक उद्यान असून त्याच्या सुशोभीकरणाचे काम झालेले आहे. ‘ओपन जिम’ची संकल्पना या ठिकाणी राबविण्यात आली आहे. या ठिकाणी २४ तास सुरू असणारी अभ्यासिका झाल्याने नागरिक समाधानी आहेत. या प्रभागात मलनि:सारण वाहिन्यांचे काम प्रलंबित आहे.

प्रभाग १३

प्रभाग १३ मध्ये सेक्टर ३ येते. या प्रभागात मध्यमवर्गीय लोकवस्ती असून अरुंद रस्ते ही समस्या आहे. या प्रभागत चांगले काम झाले आहे ते अग्निशमन वसाहतीचे.  वाहतूक कोंडी ही मोठी समस्या या प्रभागाची आहे. सध्या यावर उपाय म्हणून ठाणे-बेलापूर रस्त्यावरील प्रवेशावर रस्ता मोठा करण्यात आला आहे. त्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. एरोलीत एकाच प्रभागात तीन उद्याने आहेत. यात राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ अशी तीन उद्याने आहेत. शिवाय एक विरंगुळा केंद्रही आहे. ठाणे-बेलापूर तसेच अंतर्गत जोडरस्त्यांचा प्रश्न आहे.

प्रभाग १४

प्रभाग १४ मध्ये सेक्टर १९ व २० चा भाग येतो. सिडकोकालीन अनेक सोसायटय़ा या प्रभागात असून रस्ते अरुंद आहेत. त्यात रस्त्यावर पार्किंग होत असल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. मलनि:सारण वाहिन्यांची कामे सुरू आहेत. वाहनतळ नसल्याने पार्किंग ही मोठी समस्या आहे.