फक्त पाच हजार कुप्या शिल्लक; पहिली मात्रा देण्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडे लस कुप्यांचा तुटवडा भासू नये यासाठी दोन लाख लस कुप्यांची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र शासनाकडून २० हजार ‘कोव्हिशिल्ड’च्या लस कुप्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र ‘कोव्हॅक्सिन’ लस न मिळाल्याने या लसींचा तुडवडा भासणार आहे. त्यामुळे पहिली मात्रा देण्यासाठी कोणत्या लसीची द्यायाची हा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. पालिकेकडे  ‘कोव्हॅक्सिन’ च्या फक्त पाच हजार कुप्या शिल्लक आहेत.

शहरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोठय़ा प्रमाणात सुरू असून आतापर्यंत ६३ हजारांपेक्षा अधिक जणांना लस देण्यात आली आहे.  दिवसाला ५ हजार जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी पालिका व खासगी रुग्णालयांत मिळून ३७ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. तसेच पुढील काळात ५० केंद्रांची निमिर्ती करीत १ लाख ८० हजार जणांना लस देण्याचे पालिकेचे नियोजन केले आहे. यासाठी तुर्भे येथील निर्यात भवन येथे जम्बो लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून शनिवारपासून या ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार पहिली मात्रा घेणाऱ्यांना ‘कोव्हॅक्सिन’ लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाकडे ‘कोव्हॅक्सिन’ लशींच्या १ लाख २५ हजार कुप्या व ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या ७५ हजार कुप्यांची गरज असून दोन्ही मिळून दोन लाख कुप्यांची मागणी  केली  होती. मात्र यापैकी ‘कोव्हिशिल्ड’च्या २० हजार कुप्यांची लस पालिकेला मिळाली असून सद्यस्थितीत १३ हजार लस कुप्या शिल्लक आहेत. मात्र ‘कोव्हॅक्सिन’ लस पालिकेला मिळाली नाही. ‘कोव्हॅक्सिन’ सध्या पालिकेकडे पाच हजार लस कुप्या शिल्लक आहेत. दिवसाला ५ हजार जणांना लस दिली जात आहे. त्यामुळे ‘कोव्हॅक्सिन’ लसींचा तुडवडा निर्माण होणार होऊ शकतो.  पालिका प्रशासनाने दोन दिवसात ही लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.  मात्र नवीन लस घेणाऱ्यांना कोणती लस द्यायची हा पेच पालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात लसीकरण होत असून शनिवारपासून ‘जम्बो’ केंद्र सुरू करण्यात येत आहे. पालिकेकडे ‘कोव्हिशिल्ड’ च्या १३ हजार मात्रा असून ‘कोव्हॅक्सिन’ च्या  ५ हजार मात्राच शिल्लक आहेत. त्यामुळे पहिली मात्रा कोणत्या लशीची द्यायची याबाबत परवानगी मागीतली आहे. लसींचा तुटवडा असे म्हणता येणार नाही. दोन दिवसात लस उपलब्ध होईल.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

 

लसीकरण

१९,३३२ करोना योद्धे

११,९५७ पहिल्या फळीतील करोना योद्धे

३२,४३४ ज्येष्ठ व सहव्याधी नागरिक