24 November 2017

News Flash

तरण तलावाची रखडकथा

सिडकोने जलतरण तलाव बांधण्यासाठी वाशी सेक्टर १२ येथील भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केला

संतोष जाधव, नवी मुंबई | Updated: September 13, 2017 3:48 AM

स्वत:चा तलाव बांधण्यात पालिकेला अपयश; चार हजार चौ.मी.चा भूखंड पडून

नवी मुंबई महापालिकेचे खेळाडूंना सुविधा मिळवून देण्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. पालिकेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कुस्तीचा आखाडा बांधण्यास सुरुवात करणाऱ्या या पालिकेने नवी मुंबईकरांना अद्याप जलतरण तलावही उपलब्ध करून दिलेला नाही. कॉमनवेल्थसह विविध जलतरणात स्पर्धामध्ये लक्षणीय कामगिरी करणारे जलतरणपटू शहरात असूनही सरावासाठी त्यांना अन्य पालिकांच्या हद्दीत जावे लागत आहे. सिडकोने पालिकेला जलतरण तलावासाठी हक्काचा भूखंड दिला आहे, जलतरण तलाव बांधण्याचा प्रस्ताव पालिकेत संमत झाला आहे, तरीही पालिकेला अद्याप एकही तरण तलाव बांधता आलेला नाही.

सिडकोने जलतरण तलाव बांधण्यासाठी वाशी सेक्टर १२ येथील भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केला. हा भूखंड जलतरण तलावासाठी अपुरा असल्याने एनएमएमटीसाठी दिलेल्या भूखंडातील काही भाग जलतरणासाठी वर्ग केला. आता सुमारे चार हजार चौरस मीटरचा भूखंड जलतरणासाठी उपलब्ध आहे. पालिकेने २०१० च्या अर्थसंकल्पात जलतरण तलावासाठी खर्चाची तरतूदही केली होती. जलतरण तलावनिर्मितीसाठी रुपयांचा प्रस्तावही मंजूर केला, परंतु त्यानंतरही तलाव काही प्रत्यक्षात आलाच नाही.

नवी मुंबई शहरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई, कॉमनवेल्थ स्पर्धामध्ये सहभागी झालेले आणि आशियाई स्तरावर विक्रम नोंदवलेले खेळाडू आहेत. तसेच जलतरणात शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू व प्रशिक्षकही या शहरात आहेत, परंतु ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव नसल्याने या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी पैसा आणि वेळ खर्च करून शहरात जावे लागते. अनेकांकडे गुणवत्ता असूनही पालिकेने सुविधा न दिल्याने त्यांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागते. नवी मुंबई महापालिकेला देशभरात विविध पुरस्कारांनी गौरविले आहे, मात्र खेळांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. शहरात ज्योत्स्ना पानसरे, विराज प्रभू, शुभम वनमाळी, श्रुतुजा उदेशी, लेखा कामत, अपेक्षा श्री राव, पायल श्री राव यांसारखे अनेक खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी मुंबईचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच शहरात टी. एस. चाणक्य, डी. वाय. पाटील, नवी मुंबई स्पोर्टस क्लब, यंग मिशनरी कॅथलिक असोसिएशन, फादर अ‍ॅग्नेल, नेरुळ जिमखाना या खासगी संस्थांचे जलतरण तलाव आहेत, परंतु पालिकेचा जलतरण तलावच नाही.

शेजारच्या पालिकांतील तलाव

०४  ठाणे महापालिका

०२  केडीएमसी

०७ मुंबई महापालिका

खासगी संस्थांचे तलाव व मासिक शुल्क

तलाव                                                शुल्क

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन        ९०० रु.

डी. वाय. पाटील                                ३०० रु.

नेरुळ जिमखाना                              १२०० रु.

वायएमसी                                       १३०० रु.

फादर अ‍ॅग्नेल                                   १००० रु.

प्रस्तावित तरण तलाव

* ठिकाण – वाशी, सेक्टर १२, भूखंड क्रमांक १९६, १९६ ए

*  सिडकोकडून भूखंड हस्तांतर – वर्ष २००९

*  भूखंड क्षेत्रफळ – ४००० चौ. मी.

*  प्रस्ताव मंजूर – वर्ष २०१३

*   प्रस्तावित खर्च – ४१ कोटी

पालिकेने जलतरण तलावासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर केला होता, परंतु त्या भूखंडावरील अतिक्रमणाबाबत प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात जलतरण तलावाची तरतूदही आहे. त्यामुळे लवकरच तलाव उपलब्ध करून देण्यात येईल.

– मोहन डगावकर, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

नवी मुंबईत पालिकेने शहरात २५ वर्षांत स्वत:चा जलतरण तलाव बांधलेला नाही. महापालिकेने यासाठी पुढाकार घ्यावा. पालिकेच्या पहिल्या जलतरण तलावाच्यासाठी मी खासदार निधीही देण्यास तयार आहे. सामान्य नवी मुंबईकरांसाठी व शहरातील जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव असलाच पाहिजे.

– राजन विचारे, खासदार

पालिका खेळांविषयी उदासीन आहे.  शहरात जलतरण तलाव बांधणे आवश्यक आहे.  खासगी संस्थांचे जलतरण तलाव आहेत, तिथे अधिक पैसे खर्च करून प्रशिक्षण घ्यावे लागते आणि सराव करावा लागतो.

– गोकुळ कामत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू

मला सरावासाठी शीव येथे जावे लागते. बंगलोर येथे राष्ट्रीय स्तरावरील केंद्रात तीन वर्षे सराव केला. पालिका जलतरण तलाव बांधणार होती, पंरतु त्याचे काय झाले माहीत नाही.

– ज्योत्स्ना पानसरे, कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी जलतरणपटू

मी जलतरणात विविध विक्रम नोंदवले आहेत. परंतु आपल्या नवी मुंबईत महापालिकेचा जलतरण तलाव नाही. सरावासाठी शहराबाहेर जावे लागते. पालिकेने ऑलिम्पिक स्तरावरील तलाव बांधल्यास आम्हाला सरावासाठी खूप उपयोग होईल.

– शुभम वनमाळी, जलतरणपटू

First Published on September 13, 2017 3:40 am

Web Title: navi mumbai municipal corporation fail to build its own swimming pool