नवी मुंबई पालिकेला दररोज एक कोटींचे उत्पन्न

महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने अवलंबलेली ढोल-ताशांच्या गजराची मात्रा लागू पडली आहे. पालिकेच्या आठ विभागांत मिळून रोज १ कोटीपेक्षा अधिक थकीत मालमत्ता कराची वसुली होत आहे. मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. काही विभागांत मालमत्ता सील करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारपासून थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करून जप्ती, अटकावणी केली तसेच बँक खाते सील करण्याची धडक कारवाई करण्यात येणार आहे. शुक्रवारी बेलापूर विभागात एक हॉटेल सील करण्यात आले.

नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ताकराच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. आर्थिक वषाच्या अखेरीस पालिकेने थकबाकीदारांविरोधात कडक धोरण अवलंबलेआहे. शहरातील विविध गृहनिर्माण सोसायटय़ा, एमआयडीसीतील उद्योजक, हॉटेल्स, बार व इतर व्यावसायिकांची जवळजवळ ११०० कोटींची थकबाकी आहे. वसुलीसाठी पालिका अधिकाऱ्यांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.

नवी मुंबई महापालिकेत बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे,घणसोली, ऐरोली, दिघा या विभाग कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या थकीत मालमत्ताधारकांकडून वसुली करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वसुलीला वेग आला आहे.

बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत सीबीडी सेक्टर १५ येथील हॉटेल व गृहनिर्माण सोसायटय़ांसमोर ढोल ताशांचा गजर केल्यानंतरही हॉटेल व लॉजमालकाने थकीत भरणा न केल्यामुळे हॉटेल व लॉजवर सील करण्याची कारवाई विभाग कार्यालयाअंतर्गत अधीक्षकांकडून करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात एकूण ३ लाख ८ हजार मालमत्ताधारक असून आठ विभागांत मिळून ११०० कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे.

बेलापूरमध्ये हॉटेल सी व्ह्य़ू आहे. येथे एकूण २५ खोल्या असून त्यातील जवळजवळ १३ खोल्या पालिकेकडून सील करण्यात आल्या आहेत. संबंधित मालमत्तेचा १९९५ पासून ५०लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली असून सोमवारपासून अधिक वेगाने कारवाई करण्यात येणार आहे.   – दत्तात्रय काळे, अधीक्षक, बेलापूर विभाग कार्यालय