नवी मुंबई महापालिकेला २० हजार कुप्यांचा पुरवठा; आतापर्यंत १ लाख ४४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नवी मुंबई</strong> : नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात निर्माण झालेल्या टंचाईमुळे गेले दोन दिवस बंद पडलेले करोना प्रतिबंधक लसीकरण सोमवारी दुपारनंतर सुरू झाले. राज्य शासनाकडून नवी मुंबई महापालिकेला सोमवारी ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या २० हजार कुप्या प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात १ लाख ४४ हजार ४५९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर पालिकेने शासनाकडे २ लाख ५० हजार कोविशिल्ड व ७५ हजार कोवॅक्सिन लस कुप्यांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती पालिका लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी  दिली.

पालिकेची २३ नागरी आरोग्यकेंद्रे, वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालये, तुर्भे येथील माताबाल रुग्णालय, कामगार विमा रुग्णालयातील १ जम्बो लसीकरण केंद्र तसेच खाजगी २२ रुग्णालयांत अशा एकूण ५० केंद्रावर सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शहरातील शासनाने मान्यता दिलेल्या विविध वयोगटातील अशा ४ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या नेरुळ फेज १, नेरुळ फेज २, नोसिल नाका व महापे या चार नागरी आरोग्य केंद्रांमध्येही  सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आले आहे.  खासगी रुग्णालयात सोमवारपासून एमजीएम सीबीडी, न्यू मिलेनियम सानपाडा, क्रिटीकेअर  हॉस्पिटल ऐरोली व न्यू मानक नेरुळ रुग्णालयात नव्याने लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

आता महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली या तिन्ही रुग्णालयात दररोज २४ तास दिवसरात्र लसीकरण केंद्रे  सुरू आहेत. याशिवाय तुर्भे येथील रामतनु माता बाल रुग्णालय आणि २३ नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे सेक्टर ५ वाशी येथील कामगार विमा रुग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रात ४ बूथवर सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत दोन सत्रात लसीकरण सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित केंद्रांवर आठवडय़ाचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे.   कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस १३,४५२ नागरिकांनी घेतलेला असून आजपासून कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसलाही सुरुवात करण्यात आलेली आहे. ‘पालिका आवश्यकतेनुसार शासनाकडे लस मागणी करत असून आणखी मागणी केलेली लसही तात्काळ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून, लसीकरणात खंड पडणार नाही,’ असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाचा तपशील

तपशील                                                                                  पहिला डोस          दुसरा डोस

डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी                                                         २५५१६               १३५८४

पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योद्धे    १९२२६                 ६९६३

ज्येष्ठ नागरिक                                                                             ५०,००७                  ६७७

४५ वर्षांवरील सहव्याधी व्यक्ती                                                       १०,२७७                 २६२

४५ ते ६० वयाचे नागरिक                                                                  ३९४३३

एकूण                                                                                              १,४४,४५९

ठाणे जिल्ह्याला ८५ हजार कुप्यांचा पुरवठा

ठाणे :  करोना प्रतिबंधात्मक लशीचा साठा संपल्यामुळे गेले दोन दिवस बंद पडलेली लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्याला ८५ हजार लशीचा साठा उपलब्ध झाला असून आणखी ८१ हजार कुप्या येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेने वेग धरला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक लसीकरणात ठाणे आणि नवी मुंबई या महापालिका आघाडीवर आहेत.