तिसऱ्या लाटेसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात नव्या करोना रुग्णांची संख्या फेब्रुवारीच्या मध्यापासून सातत्याने वाढत असून शहरात आतापर्यंत एका दिवसाची सर्वाेच्च संख्या १४४१ आहे. ती नव्या रुग्णांची संख्या कमी होऊन ५०० पर्यंत खाली आली आहे. ही संख्या कमी होत असली तरी मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या दूरचित्रसंवादामध्ये जुलै ऑगस्ट दरम्यान करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असून तत्काळ तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात ५० वर्षावरील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याने शहरातील जवळजवळ १ लाख ज्येष्ठ नागरिकांना एक डोस तरी मिळालाच पाहिजे हे लक्ष पालिकेने निश्चित केले असून तिसऱ्या लाटेच्या तयारीला सुरुवात केली असल्याची माहिती पालिका आय़ुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. नवी मुंबई शहरात एकीकडे करोनाचे नवे रुग्ण ५००च्या जवळपास स्थिरावले असल्याचे दिसत असताना ज्येष्ठांचा मृत्यू ही चिंतेची बाब असून ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत त्याच्या मृत्यूबाबत पालिका गंभीर असून त्यादृष्टीने लसीकरण वाढवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

पालिकेने दिवसाला १० हजार लसीकरणाचे लक्ष ठेवले असून दुसरीकडे खासगी रुग्णालयातील केंद्र बंद होणार असल्याने व त्या रुग्णालयातील लसीबाबतची जबाबदारी खासगी रुग्णालयाची असल्याने पालिकेने आपली केंद्र वाढवून जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणाचे सुरक्षाकवच देण्याचे लक्ष निश्चित केले आहे. नवी मुंबई महापालिकेची तरंगती लोकसंख्या १५ लाख असून या लोकसंख्येच्या १० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या असून या सर्व नागरिकांना करोनाच्या संभाव्य असलेल्या तिसऱ्या लाटेच्या पूर्वी जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येणार आहे.

शहरात खासगी रुग्णालयांची २१ तर पालिकेची २८ अशी एकूण ४९ केंदे् आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या प्रत्येक केंद्रावरील बुथ वाढवण्याबरोबरच नवीन केंद्र करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यामुळे एकीकडे खाटांची व ऑक्सिजनची व्यवस्था करताना शहरातील नागरिकांना लसीकरण करून सुरक्षाकवच देण्याचे लक्ष आहे. त्यामुळे एकीकडे शहरात करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे तिसऱ्या लाटेची तयारी पालिकेने सुरू केली आहे. शहरात सातत्याने खाटांची संख्या तसेच अतिदक्षता व जीवरक्षक प्रणाली खाटांची संख्या वाढत असून खाटांच्या निर्मितीबरोबरच लसीकरणावर जास्त लक्ष दिले जाणार आहे. शहरातील पालिकेची केंद्र वाढवण्यासाठी समाज मंदिरांचा वापर करण्याची चाचपणी, ज्येष्ठांची वेगळी लसीकरण केंद्र शहरात सध्या पालिका रुग्णालये, नागरी आरोग्यकेंद्र येथे लसीकरण केंद्र असून पालिका आयुक्तांनी लसीकरण केंद्रासाठी समाज मंदिराची चाचपणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने सध्याच्या केंद्रामध्ये वाढ केली जाणार असून विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी केंद्र करण्याची तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जुलै, ऑगस्ट दरम्यान तिसऱ्या लाटेची शक्यता असून त्यासाठी तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेने तयारी सुरू केली असून करोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी शहरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र करण्यात येणार असून केंद्रांची व तेथील लसीकरण बुथ यांची संख्या वाढवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.  – अभिजीत बांगर, आयुक्त