मालमत्ता करवसुलीतील घोळ संपविण्यासाठी छाननी करण्याची पालिका प्रशासनाची तयारी

संतोष जाधव, नवी मुंबई</strong>

एकाच मालमत्तेवर दुबार देयके असल्याने थकबाकीचा फुगवटा २१०० कोटी रुपयांपर्यंत दाखविण्यात आला आहे. पालिका स्थापनेपासून बिलांचा घोळ सुरू आहे. याबाबत या देयकांची छाननी न केल्याने हा घोळ झाल्याची बाब उघड झाली आहे.

थकीत मालमत्ता करधारकांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट देणारी अभय योजना १ डिसेंबरपासून पुढील ४ महिने सुरू राहणार आहे. अनेक ठिकाणी एकाच मालमत्तेला एकाहून अधिक देयके दिली जात असल्याने थकबाकीचा फुगवटा वाढत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई महापालिकेत असलेल्या बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, दिघा, घणसोली विभागांमध्ये आजवर एकूण तीन लाख १३ हजार ५५२ मालमत्ता देयके दिली जात आहेत. परंतु यात एकाच मालमत्तेवर दुबार देयके देण्यात आली आहेत. या देयकांची कोणतीही आकडेवारी सध्या पालिकेकडे उपलब्ध नाही.

पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून माहिती जमा करण्यात आली आहे. परंतु त्यात रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक देयके एकाच मालमत्तेवर एकाहून अधिक वेळा निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात थकीत वसुली कमी असल्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुबार देयके आल्याचे निदर्शनास आल्यानंतर काहींनी पालिकेकडे धाव घेतली आहे. त्यानंतर ही बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्तांच्या थकीत रकमेत आणि दंडात्मक रकमेत वाढ होऊन कोटय़वधींच्या रकमा थकीत आहेत.

काही प्रकरणांत मोकळ्या मैदानावरही मालमत्ता कर आकारणीवरून वाद झाले आहेत. थकीत रकमेचा आणि एकाच मालमत्तेवर दिल्या गेलेल्या देयकांबाबत ठोस निर्णय करून योग्य कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. थकीत मालमत्ता करांमध्ये सिडको तसेच शासकीय आस्थापनांकडून येणारी थकबाकीही मोठी आहे.

याबाबत मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त अमोल यादव यांना विचारणा केली असता एकाच मालमत्तेला दोन वेगवेगळी देयके दिली गेल्याने थकीत रकमेचा आकडा खूप मोठा दिसत आहे. पालिकेला ही एकाच मालमत्तेवर दोन वेळा बिले दिल्याचे संपूर्ण देयकांची छाननी केल्यानंतर हा घोळ निस्तरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्पोर्ट्स क्लबच्या बांधकामावर मालमत्ता कर आकारला जात असताना दुसरीकडे खेळाच्या मैदानावरही मालमत्ता कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे मालमत्ता कराबाबतच्या आकारणीबाबत अशासकीय ठराव येणाऱ्या महासभेत मांडणार असल्याचे पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सांगितले.

मालमत्ता कर अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु एकाच मालमत्तेला दोनदा देयके दिली आहेत. याबाबत मालमत्ता कर उपायुक्तांना छाननी करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 – अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त

२११३.३७ कोटी : मालमत्ता कराची एकूण थकीत रक्कम 

९६९.५६ कोटी : मूळ थकीत रक्कम 

११४३.८१ कोटी : दंडात्मक रक्कम