नवी मुंबई : शहरातील करोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय असला तरी मृत्यू दर रोखण्यात पालिका प्रशासनाला यश येत आहे. मात्र, हा दर शून्यावर आणण्यासाठी सातत्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने व्यक्त केले आहे.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकारी आणि डॉक्टरांच्या दैनंदिनी बैठकीत ही मुद्दा प्रकर्षांने मांडण्यात आला. पथकांतील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडलेले निष्कर्ष आणि उपाययोजना यावर मंथन होण्याची गरज या वेळी प्रतिपादण्यात आली. पालिकेने मिशन शून्य मृत्यूदर मोहिम सुरू केली आहे.

पालिकेने विविध प्रकारच्या तपासण्या सुरू केल्याने ही संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या सर्व रुग्णांना उपचारसुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  प्राणवायू आणि अतिदक्षता विभागातील खाटांची कमतरता भासत आहे. तो वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व उपाययोजनांमध्ये मृत्यूदर रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेने स्वीकारले आहे. याआधी हा मृत्यूदर ३.२ असा होता. तो आता २.५ वर आला आहे. ५०० आरोग्य तपासण्या होत असताना दिवसाला पाच ते सहा रुग्ण दगावत होते. ती संख्या आता तीन ते चार वर आली आहे. मृत्यूदर शून्यावर आणणे अशक्य आहे. पण, पालिका त्यासाठी प्रयत्न करी आहे. दिवसभरात  होणाऱ्या मृत्यूसंदर्भात सायंकाळी दैनंदिन बैठकीत तीन ते चार तास चर्चा केली जात आहे. यात पालिकेचे कोविड डॉक्टर यांच्यासह काही खासगी रुग्णालयाचे डॉक्टर या बैठकीत सहभागी होत आहेत.

‘प्राणवायूची पातळी पुरेशी ठेवा’

रुग्णालयात उशीरा दाखल झाल्याने रुगणांची मृत्यू होत असल्याचे एकमत आहे. पालिकेने मोठय़ा प्रमाणात आरोग्य चाचण्या वाढविल्या आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि मूत्रपिंड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत आजवर ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाकाळात शरीरातील प्राणवायूची पातळी कमी होणार नाही, याची काळजी सर्वानी घेण्याची गरज आहे.