नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोना प्रसाराला आळा घालण्यासाठी महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ३ ते १३ जुलै दरम्यानं लॉकडाउन घोषित केला आहे. सध्या महापालिका क्षेत्रात लॉकडाउन लागू असून, महापालिकेने लॉकडाउनच्या नियमासंदर्भात नवीन आदेश काढले आहेत.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार होत असून, करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. ३ ते १३ जुलै या कालावधीसाठी नवी मुंबईत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

लॉकडाउन लागू करताना महापालिकेनं सर्व नियमावली जारी केली होती. त्या आदेशानंतर पुन्हा सुधारित आदेश काढण्यात आला आहे. नव्या आदेशात पुढील आदेश देण्यात आले आहेत.

लॉकडाउनच्या काळात फक्त आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

रुग्णालयीन सुविधांमध्ये दातांचे दवाखानेही बंद राहतील.

डिपार्टमेंटल स्टोअर्स (उदा. डी-मार्ट, रिलायन्स फ्रेश, मोअर, बिग बाजार इत्यादी) बंद राहतील. मात्र, होम डिलीव्हरी सुरू राहील.

सर्व उद्याने, पार्क, गार्डन, ओपन जिम बंद राहतील.

सर्व सोसायट्यांच्या आवारातील व्यायामशाळा (जिम) व स्वीमिंग पूल इत्यादी बंद राहील.

पालिका हद्दीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. या वेळी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचे महापालिकेच्या यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यावर अधिक भर द्यावा, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.