नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसीतील भाजी बाजार कधी बंद, कधी सुरू.. अशी स्थिती आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनीही भाजी बाजारातील गर्दीवर नियंत्रणासाठी बंधने घतली आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शेतकरी ते ग्राहक असे थेट नियोजन करण्यात आले असून भाजीपाला मागणीनुसार सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच मिळणार आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी, पुरवठादार आणि ग्राहक (खरेदीदार) यांच्यात समन्वय करीत हा भाजीपाला पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक व्यवस्था असलेली वाहने निर्जंतुकीकरण करूनच मालाचा पुरवठा केला जाणार आहे. मास्क, हॅण्डग्लोज आदी सुरक्षा सुविधाही दिल्या जाणार असून सोसायटीच्या दारात हा भाजीपाला विक्री केला जाणार आहे.   ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून भाजीपाला विकण्याची इच्छा असेल त्यांनी पालिकेने नेमलेल्या संस्थेशी संपर्क साधल्यास त्यांच्या भाजीपाला थेट ना नफा ना तोटा तत्त्वावर ग्राहकापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना १५ फुटांचे अंतर ठेवून खरेदी करावा लागणार आहे. यामध्ये टोकन पद्धत राबवली जाणार असून डिजिटल पेमेंट सुविधाही असणार आहे.

नवी मुंबई पालिकेने हा उपक्रम सुरू केला असून त्याला प्रतिसाद वाढत आहे. नवी मुंबई राहणाऱ्या नागरिकांच्या जनसंपर्क साखळीतून शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबवली जात आहे. यासाठी भाजी विक्रेते, पालिका भाजी मंडई तसेच डी मार्ट, रिलायन्ससारख्या आस्थापनांनाही भाजीपाला देण्यात येणार असून त्यांच्यामार्फतही वितरण होणार आहे.

– नितीन काळे, उपायुक्त

शेकऱ्यांसाठी संपर्क

संतोष जगदाळे

मोबाइल क्रमांक ९८९२८८०८९५

व्हॉटसअ‍ॅप क्रमांक ९५९४६ ६४८०५