देशातील अनेक स्वायत्त संस्था स्मार्ट सिटी अंतर्गत मिळणारा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करीत असताना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधरण सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताच्या जोरावर फेटाळून लावला आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. अशी तक्रार यापूर्वी विशेष समितीच्या निवडीबाबत करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च केले असून ४ लाख नागरिकांच्या सूचना घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यावर राज्य शासन काय निर्णय घेणार आहे. याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत राज्यातील दहा शहरांचा सहभाग झाला असून, त्यात नवी मुंबई आघाडीवर आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने अव्वल येण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
स्मार्ट सिटी योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकार व राज्य शासनाला सादर करण्यासाठी महासभेची मंजुरी घेणे आवश्यक होते. महासभेच्या मंजुरीनंतरच या योजनेची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. मात्र महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमतावर आयुक्त दिनेश वाघमारे यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामधील दरी वाढली असून संघर्षांला सुरुवात झाली आहे.