29 September 2020

News Flash

शिस्तीच्या छडीमुळेच नवी मुंबई स्वच्छ

सिडकोने वसविलेल्या नवी मुंबईत ९६ टक्के लोकवस्ती सुशिक्षितांची आहे.

महापौर सुधाकर सोनावणे आणि आयुक्त रामास्वामी एन. यांना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

स्वच्छता सर्वेक्षणात देशात आठवा क्रमांक; घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्ती, शौचालय उभारणीमुळे यश

आधीच नियोजनबद्ध असलेल्या नवी मुंबईत सातत्याने राबवण्यात आलेल्या विविध योजना आणि त्यांची केलेली काटेकोर अंमलबजावणी यामुळे नवी मुंबई हे देशातील आठवे आणि राज्यातील एकमेव स्वच्छ शहर ठरले. महापालिका प्रशासनाने उगारलेल्या शिस्तीच्या छडीमुळेच शहराला हा मान मिळाला. महापौर सुधाकर सोनावणे आणि आयुक्त रामास्वामी एन. यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला.

सिडकोने वसविलेल्या नवी मुंबईत ९६ टक्के लोकवस्ती सुशिक्षितांची आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत पालिकेने  केलेल्या अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी काहीशी सुकर झाली. केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छता मिशन अंर्तगत पालिकेने यासाठी सर्वप्रथम प्रकल्प अंमलबजावणी कक्ष सुरू केला. यात १० महिन्यासाठी आलेले पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सिंहाचा वाटा आहे. अस्वच्छता आढळल्यास, त्या प्रभागातील अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा संदेशच मुंढे यांनी दिला होता. त्यामुळे पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लागली.

पालिकेने वैयक्तिक घरगुती शौचालये, सार्वजनिक शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, माहिती शिक्षण व प्रसार आणि जनजागृती याला प्राधान्य देऊन नागरिकांचा सहभाग वाढविला. त्यामुळे उघडय़ावर शौचास जाणाऱ्या तीन हजार कुटुंबांना ६९ सार्वजनिक शौचालये तातडीने बांधून देण्यात आली. १९३५ घरगुती शौचालयांच्या जागी सुधारित शौचालये बांधण्याची सूचना करण्यात आली. घरगुती शौचालयांसाठी अनुदान देण्याची तयारीही पालिकेने दाखविली. ३६९ सामुदायिक शौचालये बांधली आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन २० ‘ई-टॉयलेट्स’ बांधण्यात आली. केवळ महिलांसाठी सहा ‘शी टॉयलेट्स’ आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील औद्योगिक वसाहत लक्षात घेता सीएसआर अंर्तगत कंपन्यांना शैाचालय बांधण्यास प्रवृत करण्यात आले. त्यामुळे नवी मुंबई हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित झाले.

पालिकेने या स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी १७० विशेष मोहिमा घेतल्या. त्यात यंदा एक लाख ६५ हजार तास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना पालिकेचे सदिच्छादूत म्हणून नेमण्यात आले. अभिनेत्री जुही चावला हिने प्लास्टिकमुक्तीची घोषणा दिली. सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे प्लास्टिकमुक्त करण्यात आली.

प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी एक लाख विद्यार्थ्यांना स्वच्छता सैनिक म्हणून नेमण्यात आले. कचरा कुंडीतील कचरा सफाई कामगारांनी उचललेला आहे, की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक कुचराकुंडीवर आरएफ आयडी तंत्रप्रणाली बसवण्यात आली आहे, पालिकेच्या मुख्यालयात बसून अधिकाऱ्यांना १३ हजार ५०० कचराकुंडय़ांच्या साफसफाईची माहिती मिळते. शहर कचराकुंडीमुक्त व्हावे यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या ७०० मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत तयार केले जाते. नवी मुंबई पालिकेच्या तुर्भे येथील क्षेपणभूमीसारखी सोय राज्यातपालिकेत नाही. घनकचऱ्यातील प्लास्टिकचा वापर रस्ते बांधण्यासाठी केला.

घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन

स्वच्छ शहर मिशनअंर्तगत पालिकेने घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. नागरिकांना सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी दोन वेगळ्या रंगांचे डबे देण्यात आले. कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा उचलला जाणार नाही, अशी तंबीदेखील पालिकेने दिली होती. त्यामुळे काही काळ नाराजी पसरली होती पण नंतर अंमलबजावणी होऊ लागली. इलेक्ट्रॉनिक कचरा टाकण्यासाठी लाल डबे देण्यात आले. सोसायटय़ा, मॉल्स, हॉटेल्स, हॉल यांनी आवारात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावावी किंवा एखादा खत प्रकल्प उभारावा यासाठी पालिकेने ३०० सोसायटय़ा, मॉल्स, शाळा, हॉल यांना नोटिसा दिल्या आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून  काही सोसायटय़ा, संस्था व अस्थापनांनी खत प्रकल्प उभारले.

नवी मुंबई पालिकेला मिळालेला स्वच्छतेचा पुरस्कार हा येथील नागरिकांमुळे प्राप्त झाला आहे. हा नवी मुंबईच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे. हे यश सर्वाचे आहे. यानंतर पालिकेची जबाबदारी आणखी वाढली आहे.

सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई

स्वच्छतेचा पुरस्कार नवी मुंबई पालिकेला मिळाल्यामुळे आनंद झाला आहे. हा पुरस्कार येथील जनतेचा आहे. त्यांच्या सहभागामुळे स्वच्छ मिशन पालिका पूर्ण करू शकली आहे. त्यामुळे अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 12:36 am

Web Title: navi mumbai municipal corporation swachh bharat rankings 2017 solid waste management
Next Stories
1 स्वच्छतेच्या परीक्षेत मुंढेंनाही ‘प्रशस्ती’
2 पथदिव्यांवर शेकापची बेकायदा फलकबाजी
3 पनवेलच्या शाळांसाठीचा निधी परत
Just Now!
X