नवी मुंबईतील राजकीय व्यवस्थेला नकोसे झालेले आणि दिघा येथील बेकायदा बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागलेले नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या धडाकेबाज कामाची दखल अखेर राज्य सरकारला घ्यावी लागली आहे.

मुंढे यांच्या कार्यकाळात नवी मुंबई महापालिकेने घनकचरा वर्गीकरणामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलीच. शिवाय रसातळाला गेलेल्या महापालिकेच्या तिजोरीत विक्रमी करवसुलीचा धडाका लावत चांगलीच गंगाजळी जमा केली. मुंढे नको म्हणून नवी मुंबईतील राजकीय नेते मोर्चेबांधणी करीत असताना त्यांनी राबविलेल्या आक्रमक स्वच्छता अभियानामुळे राज्यातील सर्वात स्वच्छ शहर असा बहुमानही नवी मुंबईच्या वाटय़ाला आला. या कामाची दखल घेत राज्य सरकारने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच हस्ते मुंढे यांचा विशेष सत्कार केला.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची १० महिन्यांची वादळी कारकीर्द येथील राजकीय व्यवस्थेला नकोशी झाली होती. महापालिका आयुक्त म्हणून केलेल्या धडाकेबाज कामामुळे येथील बेकायदा बांधकाम करणारे माफिया, निविदा टक्केवारीत रममाण झालेले राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची अभद्र युती, विकासक तसेच स्वमग्न पत्रकारांना एकामागोमाग एक धक्के बसत होते. त्यामुळे ही सर्व मंडळी मुंढे यांच्या बदलीसाठी देव पाण्यात ठेवून बसली होती. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील शिवसेनेचे नेते मुंढे यांच्या बदलीसाठी गळ्यात गळे घालताना दिसत होते. मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर केल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंढे यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी आतुर झालेले नेते थेट रस्त्यावर उतरले होते. दरम्यानच्या काळात दिघा येथील बेकायदा बांधकाम प्रकरणात कठोर भूमिका घेणाऱ्या मुंढे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाची नाराजी ओढवून घेतली आणि अवघ्या १० महिन्यांत त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे सुजाण नवी मुंबईकरांना चुटपुट लागली असतानाच आयुक्त म्हणून त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारने अखेर घेतली आहे.

स्वच्छता, वसुलीचे कौतुक

मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होती. १० महिन्यांत मुंढे यांनी मालमत्ता तसेच स्थानिक संस्था कराच्या वसुलीसाठी आक्रमक मोहिमा राबवीत महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल ३०० कोटी रुपयांची भर टाकली आहे. याशिवाय केंद्र सरकारने आखलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून नवी मुंबईत विशेष मोहीम राबवीत शहर हागणदारी मुक्त कसे होईल या दृष्टीने मुंढे यांनी प्रयत्न केले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावली जावी यासाठी वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे इशारे त्यांनी दिले. याचा एकत्रित परिणाम म्हणून केंद्र सरकाने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यात नवी मुंबईला पहिला क्रमांक मिळाला असून या कामाची दखल घेत राज्य सरकारने मुंढे यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा या दोन कामांसाठी सत्कार केल्याने नवी मुंबईतील राजकीय व्यवस्थेकडून बेदखल मुंढे यांना सरकारकडून कामाची पावती मिळाल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे.